मेळघाट म्हंटलं की पुढचा शब्द येतो तो व्याघ्र प्रकल्प. हाच मेळघाट परिसर आता पक्षांचे नंदनवन म्हणून नवीन ओळख निर्माण करतोय. याचा प्रत्यय आलाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पात करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात. २६ ते २९ जानेवारीदरम्यान करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी गणनेत Bird Census पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली. त्यात मेळघाटात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली आहे. या गणनेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सहभागी झाले होते.
हेही वाचा: बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया
अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथून सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागात विविध ठिकाणी रवाना झाली. यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती कळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमत:च नोंदविण्यात आले. त्यामुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे असे मत महाराष्ट्र पक्षीमित्र चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी नोंदवले. प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात आणि मेळवाटच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती व अकोट वन्यजीव विभागाच्या सहा. वनसंरक्षक आर्या यांच्या सहकार्याने मोहीम पार पडली.
आपणास माहिती आहे का ?: ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन मार्च महिन्यात चंद्रपूर मध्ये
प्रथमच आढळले हे पक्षीमेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये हिमालयीन रुबीथ्रोट Himalayan Rubythroat, गुलाबी गोमेट Minivet, लांब शेपटीचा गोमेट Long Tailed Minivet, काश्मिरी माशीमार Kashmir Flycatcher, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटीक Shrike व काळ्या डोक्याचा कुहुआ Black Headed Cuckooshrike हे काही दुर्मीळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक यासारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.
1 Comment
खूप छान व उपयुक्त माहिती आहे, आपल्या मुलांना अवश्य दाखवा.
दिगंबर महाजन, सदस्य, पक्षीमित्र संघटना.