महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संघटनेतर्फे येत्या ११ व १२ मार्च दरम्यान ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी “उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” व “उदयोन्मुख पक्षिमित्र” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षी अनुक्रमे अमृता गंगाधर आघाव आणि यशश्री यशवंत उपरीकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ठाणे येथील होप नेचर ट्रस्ट (HOPE) या संस्थेतर्फे प्रायोजित महाराष्ट्र पक्षिमित्र कडून दरवर्षी पक्षिमित्र संमेलनामध्ये दोन पुरस्कार प्रदान केले जातात. पक्षी अभ्यासात रुची दाखविणारे, शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थ्याना प्रोत्साहन देणे, नवीन पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक घडविणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे .
“उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” हा पुरस्कार २० वर्षापेक्षा लहान वय असलेल्या विद्यार्थ्यांस दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी नाशिक मधील निफाड तालुक्यातील अमृता गंगाधर आघाव हिची निवड करण्यात आली आहे. अमृता १२ वी इयत्तेत विज्ञान शाखेत शिकत असून, इयत्ता पाचवीत असल्यापासून ती पक्षी निरीक्षण करत आहे.
“उदयोन्मुख पक्षीमित्र” हा पुरस्कार २८ वर्षापेक्षा लहान वय असलेल्या तरुणास दिला जात असून यावर्षी हा पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील यशश्री यशवंत उपरीकर हिला जाहीर करण्यात आला आहे. यशश्री फिजीओथेरेपी या विषयात पदवीचे शिक्षण घेत असून तिला परिसरातील पक्षी तसेच जैवविविधता अभ्यास व नोंदणी यामध्ये विशेष रुची आहे.
हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया
“उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” व “उदयोन्मुख पक्षिमित्र” या पुरस्कारांसाठी पुरस्कार राशी प्रत्येकी रु. २५००/- इतकी रक्कम, व प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण ११, १२ मार्च २०२३ दरम्यान महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com