घराच्या खिडकीत, बागेत, टेकडीवर फिरायला गेल्यावर किंवा जंगलात भटकंती करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात. आपण त्यांचे फोटोही काढून ठेवतो. त्यांची पण, नावं आपल्याला माहिती नसतात. अशा हौशी पक्षिप्रेमींना मदत करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) या संस्थेने इंटरनेट ऑफ बर्डस Internet of Birds हे मोबाइल ॲप (Mobile App) सुरू केलं आहे.
तुम्ही टिपलेला फोटो या ॲपच्या कॅमेऱ्यासमोर धरला की तुम्हाला पक्ष्याचे नाव कळणार आहे. बीएनएचएसने त्यांच्या सिटिझन सायन्स या उपक्रमांतर्गत ॲक्सेंचर कंपनीच्या मदतीने हे ॲप तयार केले आहे. त्यासाठी आर्टिफशियल इंटलिजन्सची मदत घेतली आहे. भारतात तेराशेपेक्षा जास्त पक्षी आढळतात. पण सध्या या ॲपमध्ये घराच्या परिसरात, उद्यानात, टेकड्यांवर आणि जंगलात सहजासहजी दिसणाऱ्या सहाशे पक्ष्यांची माहिती उपलब्ध आहे. उरलेल्या पक्ष्यांच्या फोटो संकलनाचे काम सुरू आहे.
तुम्ही मोबाइल अथवा कॅमेऱ्यात टिपलेला फोटो या ॲपच्या विंडोसमोर धरला की फोटो स्कॅन होतो आणि पक्ष्याचे नाव समोर येते. हे ॲप सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. या ॲपवर जेवढे जास्त फोटो उपलब्ध होतील, तेवढी त्यातील फोटो ओळखण्यातील अचूकता वाढणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील या कामात मदत म्हणून तुम्ही काढलेले फोटो या अपसाठी देऊ शकतात. जर तुम्हाला पक्ष्यांची छायाचित्रे पाठवायची असतील तर internetofbirds@bnhs.org या ई-मेलवर पाठवा, असे आवाहन BNHS ने केले आहे.
अधिक माहिती येथे उपलब्ध: Internet of Birds
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com