समुद्राशेजारचं जंगल - निसर्ग रंग
समुद्राशेजारचं जंगल

कोकण म्हटलं की समुद्रकिनारा, नारळ-काजू आणि आंब्याच्या बागा असं वर्णन सगळेच करतात. या निसर्गरम्य कोकणात अजून एक सुंदर ठिकाण लपलेलं आहे, ते म्हणजे फणसाड. अनेकांना त्या परिसरात फिरूनही हे ठिकाण माहीत नाही. फणसाड म्हटले की फणसाशी निगडित एखादे गाव अथवा फणसाची बाग असे तुमचे मत होईल; पण फणसाड हे महाराष्ट्रातले समुद्राला लागून असलेले एकमेव अभयारण्य आहे.

वृक्षप्रेमींसाठी येथे सातशेहून अधिक जातींचे वृक्ष, तर पक्षिप्रेमींसाठी हे नंदनवनच आहे. ज्यांच्यावर निसर्गाने मुक्तपणे रंगांची उधळण केली, असे सुमारे 164 प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी येथे पाहायला मिळतात. आणि हां… ज्यांना वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरांमध्ये रस आहे, त्यांच्यासाठीही अनेक प्राणी स्वागतास येथे तयार आहेत.फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्‍यात आहे. बारशिव, काशीद, चिकनी, सर्वा दांडा, नांदगाव, मजगाव वळास्ते, कोकबन, सुपेगाव या 38 गावांनी ते वेढले आहे.

अनेक पर्यटक काशीद, रेवदंडा किनाऱ्यापर्यंत येतात; पण त्यांना फणसाड अद्याप माहिती नाही. पर्यटकांपासून दूर असल्यानेच ते अद्याप सुरक्षित आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. फणसाड हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते. त्या वेळी शिकारीसाठी नबाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांनी “बारी’ असे म्हणतात. 1948 मध्ये संस्थान खालसा झाल्यानंतर जंगलतोड आणि अवैध शिकारींमुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कोळसानिर्मिती आणि बॉक्‍साईट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा ऱ्हास होऊ लागला. त्यामुळे सरकारने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले. या जंगलात पानझडी, शुष्क वने आणि निम्नसदाहरित आणि सदाहरित वने आढळून येतात. समुद्राजवळ असूनही दाट झाडीमुळे येथील तापमान दमट नाही. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. पिंपळ, साग, आवळा, सप्तपर्णी, शिसव, कदंब, कळम, अंजनी, सावर, शिवण, करंज, लोखंडी, खवस असे सुमारे 718 प्रकारचे वृक्ष येथे आढळून येतात. काही ठिकाणी एक झाड सदाहरित आणि त्याच्या शेजारी पाणझडीचे झाड दिसले, तर आश्‍चर्य वाटते. गारंबीची महाकाय वेल येथे असून, त्या वेलीला चार फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आढळून येतात. याशिवाय अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीही येथे आढळतात. अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत. त्यांना स्थानिक भाषेत “गाण’ म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी येथे पक्षिसंमेलन भरते. गाणाजवळ शांतपणे बसल्यास पाणी प्यायला आलेले सांबर, भेकर आणि बिबटेही पाहायला मिळतात.

महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला शेकरू (जायंट स्क्विरल) हा प्राणी गाणजवळील सदाहरित जंगलात पाहायला मिळतो. याशिवाय बिबटे, सांबर, भेकर, लालतोंडी माकड, पिसोरी, काळमांजर, कोल्हा, खवल्या मांजर, जवादा आदी 16 जातींचे सस्तन प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे. पक्षिनिरीक्षकांसाठी फणसाड हे नंदनवन आहे. सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान पक्षिनिरीक्षणासाठी गेल्यास निसर्गाचा वाद्यवृंद विनासायास ऐकायला मिळतो.

दाट वृक्षझाडीत मोर, रानकोंबडा, चकात्री, हिरवे कबूतरे, नीलगिरी कबूतरे, कापसी, शिक्रा, सर्प गरुड, काळा गरुड, शेंडी गरुड, ब्राह्मणी घार, किरपोपट, वेडा राघू, बार्न घुबड, जंगली पिंगळा, जंगली रातवा, तांबट, दिलवाला सुतार, चंडोल, कोतवाल, भृंगराज, नारद बुलबुल, शिंपी, निळकंठ गिधाड, स्वर्गीय नर्तक, पावशा अशा 142 जातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात. भारतीय नाग, घोणस, फुरसे, मण्यार, चापडा हे विषारी; तर अजगर, धामण, डुकऱ्या घोणस, पंडोल, कवड्या, हरणटोळ, नानेटी, गवत्या साप, पाणदिवड, रातसर्प आदी बिनविषारी साप आढळून येतात. रातसर्प, तपकिरी, रुखई, तपकिरी हरणटोळ हे अत्यंत दुर्मिळ जातीचे साप येथे पाहायला मिळतात. पट्टेरी पाल आणि पावसाळ्यात खेकडेही येथे दिसतात. कीटक आणि फुलपाखरांचेही असंख्य प्रकार येथे वास्तव्यास आहेत. दुपारनंतर वेली-झुडपांवर फुलपाखरांची बाग फुललेली असते. या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घ्यायचा असेल तर वन खात्याची अट एकच आहे. तेथे झाडावर येणाऱ्या बुरशीपासून ते अगदी मोठ्यात मोठ्या प्राण्यापर्यंत कोणाला तुमचा त्रास होऊन चालणार नाही. येथील वातावरणाला धक्‍का पोचणार नाही, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. अट मंजूर असेल तर चला कोकणातले एक वेगळे जग अनुभवायला.

टीम निसर्गरंग

Leave a comment