एआयचे कॅमेरे देणार वाघ आल्याचा अलर्ट AI Enabled Camera in Tadoba
विदर्भातील नागपूर वन विभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने आता आर्टिफिशल इंटलिजिन्सची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी नागपूर वन विभागातील पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांजवळी गावांच्या सीमेवर तब्बल ३ हजार १५० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये वाघ, बिबट्यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान असणार आहे. दिवसा किंवा रात्रीही वाघ अथवा बिबट्या या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये या कॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील.
यासाठी राज्य शासनाने ‘मार्वल’ या कंपनीबरोबर विशेष सामंजस्य करार केला आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत ‘मार्वल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघात, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण ३ हजार १५० कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित हे कॅमेरे लावण्यात येतील. गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेऱ्यांशी जोडले जातील. कॅमेरे वाघ, बिबट्यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात असणार आहे. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये या कॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील.
करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात ८७५, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५२५ , नवेगाव व्याघ्र प्रकल्पात ६०० तर नागपूर वनक्षेत्रात १ हजार १४५ हे कॅमेरे व सायरन जोडले जातील. नागपूर विभागात वरचेवर वाढणारे वाघांचे हल्ले लक्षात घेऊन पालकमंत्री बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी विविध आढावा बैठकीमध्ये या बाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी, यादृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करु असे त्यांनी सांगितले होते. याबाबत राज्याचे वन मंत्री यांच्या समवेत एक व्यापक बैठक घेऊन या कराराबाबत निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण नियोजनानंतर आज या करारावर स्वाक्षऱ्या करुन लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी वन विभाग व मार्वल कंपनीला दिले.
हेही वाचा: गुजरात मध्ये येणार चित्ता
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर, क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, आर. जयराम गौडा, उपवन संरक्षकविनीत व्यास, उपसंचालक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक पुजा लिंबगावकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लगेचच ऑगस्टमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे.
image source: Grok AI
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.