Kiran Purandare Pitezari Village कचरा द्या अन् बक्षीस घेऊन जा
कचरा द्या अन् बक्षीस घेऊन जा…. Kiran Purandare Pitezari Village

कचरा द्या अन् बक्षीस घेऊन जा…. Kiran Purandare Pitezari Village

शहरातील आधुनिक जीवनशैलीचा निरोप घेऊन नागझिरा जंगलाजवळील पिटेझरी गावात Pitezari Village राहायला गेलेले पुण्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे Kiran Purandare त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागातून किरण पुरंदरे आणि त्यांच्या पत्नी अनघा पुरंदरे यांचे गेल्या काही वर्षांपासून पिटेझरी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना एकत्र आणून निसर्ग संवर्धनाचे उल्लेखनीय काम सुरू आहे. याचे चांगले परिणामही आता गावकऱयांना दिसायला लागले आहेत. पुरदंरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी सध्या शाश्वत पर्यटनाचे धडे घेत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून पुरदंरे यांनी गावकऱ्यांसाठी कचरा द्या आणि बक्षीस घेऊन जा हा भन्नाट उपक्रम सुरू केला आहे. कचरा संकलनाच्या मोहिमेतील अनुभव त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर लिहिले आहेत.

हेही वाचा: पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी

किरण पुरंदरे सध्या पिटेझरी (तालुका साकोली, जिल्हा भंडारा) या गावात राहतात. त्यांच्या गावाजवळच प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पास ८ महिन्यात सुमारे ४५००० पर्यटक भेट देतात. हे पर्यटक आणि या गावात राहणारे सुमारे ८०० लोक प्लॅस्टिक वापरतात. प्लॅस्टिकशिवाय रबर, काच, इलेक्ट्रॉनिक साहित्य, पत्रा, चामडे, थर्माकोल, कपडे इत्यादी वस्तूदेखील वापरल्या जातात. पुरंदरे आणि त्यांची टीम, माती न होणारा हा कचरा गोळा करतात. हा कचरा खैरी-वलमाझरी गटग्रामपंचायतीच्या वलमाझरी येथे असलेल्या घनकचरा संकलन केंद्रात पाठवला जातो. तिथून हा कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो.

कचरा संकलन होण्यासाठी आम्ही गावात एक प्रयोग म्हणून एक बक्षीस योजना जाहीर केली आहे. गावातील कोणतीही व्यक्ती आमच्याकडे एक पूर्ण भरलेलं कचऱ्याचं पोतं आणून देते, तेव्हा आम्ही तिला एक छोटंसं बक्षीस देतो. बक्षिसामध्ये संसारोपयोगी वस्तू आहेत. उदा. स्टीलचा डबा, टोकरी (टोपली), जर्मनचा मोठा डबा आणि शिधा. शिध्यामध्ये पोहे, साखर, तांदूळ, तूरडाळ आणि तेल यांचा समावेश केला आहे. या उपक्रमाला हळू हळू चांगला प्रतिसाद मिळत असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गावातील ११ महिलांनी बक्षिसं पटकावली आहेत, असे किरण- पुरंदरे सांगतात..
आनंदाची गोष्ट अशी की, जगात पर्यावरणाच्या, निसर्गसंरक्षणाच्या अनेक यशकथांवर महिलांची मोहोर उमटली आहे. आमच्याकडेसुद्धा एका छोट्या यशकथेची धुळाक्षरं गावातल्या वाटांवर उमटली आहेत. पुढील काही महिन्यात या उपक्रमाची व्याप्ती अजून वाढेल, असा विश्वास पुरंदरे आणि त्यांचे सहकारी लतीश हरिश्चंद्र टेकाम व्यक्त करतात.

बक्षीस विजेत्या महिलांसोबत सौ. अनघा पुरंदरे

निसर्गवेध या संस्थेच्या माध्यमातून किरण वसंत पुरंदरे यांचे पिटेझरी गावात सुरू असलेले काम अफाट आहे. त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याशी ९७६५८१८८२५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!