इंदापूर मध्ये बचाव मोहिमेदरम्यान आढळला दुर्मिळ Eurasian Otter RESQ
पुणे वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे दुर्मिळ युरेशियन ऑटर Eurasian Otter हि प्रजाती सापडली आहे. एका खोल विहिरीत एक उदमांजर अडकल्याची माहिती मिळाल्याने रेस्क्यू तर्फे तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते, उदमांजर शोधताना अनपेक्षितरित्या पाण्यात युरेशियन ऑटर असल्याचे लक्षात आले.
स्थानिक वनरक्षक मिलिंद शिंदे, अनंत हुकिरे, शुभम कडू आणि शुभम धायतोंडे आणि रेस्क्यू सीटी टीमचे सदस्य नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने बचाव योजना आखली. ऑटो ट्रॅप पिंजरा पाण्यात सोडला. सहा तासाच्या प्रतिक्षेनंतर ऑटर स्वतःहून पिंजऱ्यात आले. त्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर ऑटरला रेस्क्यू रुग्णवाहिकेत हलवण्यात आले.
हेही वाचा: १०० किलोमीटर चे अंतर कापून सह्याद्रीत आला नवीन वाघ
पशुवैद्यकीय तपासणीसाठी ऑटर ला पुण्यातील बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील युरेशियन ऑटरची ही पहिलीच नोंद आहे. अनेक दशकांपूर्वी एका ऑटर आढळल्याची नोंद झाली होती. पण आजपर्यंत येथे एकही युरेशियन ऑटर ची नोंद झालेली नाही, हे ऑटर कोठून आले आहे, याचा शोध घेण्यासाठी इंदापूरमधील परिसरात आमचे पथक आणि रेस्क्यूचे पथक पथक तैनात करण्यात आले आहे.
महादेव मोहिते – उपवनसंरक्षक पुणे (प्रादेशिक) वनविभाग
सापडलेले ऑटर एक नर आहे. सध्या त्याच्यासाठी त्याच्या पिंजऱ्यामध्ये नैसर्गिक आणि आरामदायक अधिवास तयार करण्यात आला आहे. आम्ही त्याच्यावर पूर्णवेळ कॅमेऱ्याद्वारे पूर्णवेळ लक्ष ठेवणार आहोत. रात्री ते सक्रिय असल्याचे दिसले, खाल्लेही आहे. आणि कोणत्याही मोठ्या दुखापतीची चिन्हे दिसलेली नाही. आरोग्य तपासणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल
नेहा पंचमिया, संस्थापक आणि अध्यक्ष – रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट
युरेशियन ऑटर बद्दल
युरेशियन ऑटर ही भारतात आढळणाऱ्या तीन ऑटर प्रजातींपैकी एक आहे. हे प्रामुख्याने युरोप आणि आशियाच्या काही भागात आढळत असले तरी भारतात त्याचे अस्तित्व दुर्मिळ आहे, प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य भारताचा काही भाग आणि पश्चिम घाटात विखुरलेले दिसते. युरेशियन ऑटर्स स्वच्छ, गोड्या पाण्यातील अधिवासांना प्राधान्य देतात. मासे हा त्यांचा मुख्य आहार आहे. ते एकटे, प्रामुख्याने निशाचर प्राणी आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.