जुन्या काळचे पोस्टमन ते आजचे सैनिक…. Bird Week / Pakshi Saptah
ऑक्टोबरचा पहिला आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. फुलपाखरु प्रेमींनी घेतलेल्या पुढाकारामुळे सप्टेंबर महिना हा बटरफ्लाय मंथ ठरला आणि साजराही झाला. याच धर्तीवर नोव्हेंबरचा ५ ते १२ हा सप्ताह पक्षी संवर्धन आठवडा Bird Week Pakshi Saptah जाहीर झाला आहे. हाच कालावधी ठरविण्यामागेच कारण म्हणजे ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबरला तर जेष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. या दोघांच्या जन्मदिनामध्ये आठवड्याचे अंतर असते. शिवाय नोंव्हेंबर महिना हा परदेशातील, हिमालायतील स्थलांतरित पक्षी महाराष्ट्रात येण्याचा काळ आहे. या सगळ्याचे औचित्य साधून या सप्ताहाला पक्षी संवर्धनाची जोड दिली आहे.
आपल्यापैकी बहुतांश जणांची बालपणं घरी पत्र, मनीऑर्डर किंवा भेटवस्तू घेऊन येणाऱ्या पोस्टमन काकांना बघत गेली असतील. गावांमध्ये तर पूर्वी पोस्टमन काकांच्या मागे मागे फिरत ते कोणाकोणाच्या घरी पत्र टाकतात, हे बघत फिरण्याचा मुलांचा आवडता छंदही होता.. आता इमेल, व्हॉटसअपच्या काळात क्षणाधार्त मेसेज जगाच्या पाठीवर कोठेही पोहोचतो. पण तुम्हाला जगातील सर्वात जुने संदेशावहक कोण होते…
Bird Week Pakshi Saptah पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊ या संदेशवाहक पक्ष्यांची अनोखी माहिती…
काही पक्षी आकर्षक रंगसंगतीमुळे आपल्याला आवडतात. काहींचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असतो. काहींचा पिसारा लोकांना भावतो.. काहींची शीळ तर काहींची घरटी लोकांना आवडतात. शिकारी पक्ष्यांबद्दल कुतूहल असतं तर पिटुकल्या पक्ष्यांनी आपल्या खिडकीत येऊन बसावं अशी पक्षीप्रेमींची इच्छा असते… पण याही पलीकडे जाऊन पक्ष्यांमधील वैशिष्ट्य ओळखत आपल्या पूर्वजांनी त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या खुबीने वापर केला होता. त्यातीलच एक म्हणजे संदेशवनहासाठी पूर्वी पोस्टमन प्रमाणे पक्षी काम करत होते.
“मैने प्यार किया” या चित्रपटातील नायिका जेव्हा एका कबुतराच्या चोचीत प्रेमपत्र देते आणि “कबुतर जा जा जा” हे गाणे म्हणते… तेव्हा अनेकांना चित्रपटातील हा एक रंजक प्रसंग वाटतो. पण आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वीच कबुतरांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांचा पत्रव्यवहारासाठी वापर सुरू केला होता. संदेशवहनासाठी कबुतरांना विशेष प्रशिक्षणही दिले जात असे. जुन्या ग्रंथांमध्ये, संदर्भ पुस्तकांमध्ये अतिशय बुद्धिमान असलेल्या कबुतरांच्या विशिष्ट जातींबद्दल मोठ्या प्रमाणात लिखाणही झाले आहे. आज संदेशवहनाचे इतर पर्याय खुले झाले असले तरी पूर्वी पत्रव्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या कबुतरांच्या या जातींना आजही परदेशात काळजीपूर्वक जपण्यात आलं आहे. संरक्षणही दिले आहे.
ऐतिहासिक संदर्भानुसार, प्रामुख्याने युरोपमध्ये कबुतरांना प्रशिक्षण देऊन त्यांचा संदेशवहनासाठी वापर सुरू झाला. याच काळात मुघलांनीही कबुतरे आणि ससाण्यासह काही शिकारी पक्ष्यांना पत्र पाठविण्याचे प्रशिक्षण दिले. पक्ष्यांचे वजन, त्यांना उडण्यासाठी हवी असलेली ताकद लक्षात घेता, त्यांच्याबरोबर पाठवली जाणारी पत्र, सुरनळी स्वरुपातील एकदम हलकी आणि मोजका, सांकेतिक भाषेत संदेश लिहिलेली असायची. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक खेळांची सुरुवात झाली त्या वेळी अॅथलेटिक्स खेळाडू आपल्या गावातून काही कबुतर घेऊन यायचे. खेळाडू खेळ जिंकल्यावर हा संदेश कबुतरांसोबत गावात पाठवला जात असल्याची माहिती वाचायला मिळते.
अर्थात आज, आपल्या घराशेजारी उपद्रव करणारी कबुतर आणि संदेशवनहासाठी वापरली जाणारी कबुतर वेगवेगळी आहेत. जगभरात या पक्ष्यांच्या तीनशेहून अधिक जाती आढळतात. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण जातींनाच हे प्रशिक्षण दिले होते. आता या कबुतरांचे पत्रव्यवहाराचे काम संपले असल्याने त्यांना आता उडण्याच्या स्पर्धेमध्ये उतरवले जाते. कबुतरे काळानुसार स्वतःमध्ये बदलून घेण्यास लवचिक आणि बुद्धिमान असल्याने त्यांना प्रशिक्षण स्पर्धेसाठी तयार करतात. स्पर्धेवेळी त्यांच्या मूळ स्थानापासून दूरवर अगदी दुसऱ्या राज्यात नेऊन एकाच वेळी आकाशात उडवले जाते. घोड्यांच्या शर्यती प्रमाणे त्यांची आकाशात कमी वेळेत जास्त अंतर कापण्याची स्पर्धा असते. जे कबुतर अल्पावधीत मूळ स्थानी परत येईल, ते स्पर्धा जिंकते. विजेत्या कबुतरांच्या किमती महागड्या असतात.
आपल्याकडेही राजे-महाराजांच्या काळापासून संदेश वहनासाठी कबुतरांसह अनेक शिकारी पक्ष्यांचा वापर होत असे. अकबराजवळ वीस हजार संदेशवाहक कबुतरे होती असे सांगितले जाते. कालांतराने म्हणजेच संदेश वहनाचे काम माणसाने, टपाल खात्याने सुरू केल्यानंतर या स्मरणशक्ती तल्लख असलेल्या कबुतरांचा वापर अमेरिकेच्या ‘सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने (सीआयए) कबुतरांचा युद्धाच्या कामात सुरू केला. पुढे ब्रिटिश गुप्तचर विभागानेही त्यांच्या सैन्यात कबुतरांना सहभागी करून घेतले. कबुतरांना एखाद्या लहानशा हलक्या पिंजऱयात ठेवून पॅराशूटला बांधून युरोपमध्ये आकाशात आकाशात सोडण्यात येई. ही कबुतरे गुप्त माहिती घेऊ परत येत असत.
अलीकडे शिकारी पक्ष्यांनी कबुतरांची जागा घेतली आहे. गोपनीय माहिती, महत्त्वाची छायाचित्रे मिळविण्यासाठी या पक्ष्यांचा वापर केला जातो. यासाठी त्यांच्या डोक्यावर किंवा छाती आणि पोटाच्या मध्यभागी किंवा पखांवर वजनाला अतिशय हलके कॅमेरे बसवले जातात. सीमाभागांची टेहाळणी करण्याचे काम हे आकाशातले सैनिक करतात. शत्रूला या पक्ष्यांच्या पाठीवरील कॅमेरे दिसले तर मात्र ते त्यांच्यावर निशाणा साधून पक्ष्यांना ठार करतात. भारतच नव्हे तर बहुतांश देशात सध्या पक्ष्यांचा ड्रोनप्रमाणे गस्त घाळण्यासाठी वापर होतो आहे. संदेशवाहक ते आता गस्त घालणारे सैनिक असा मोठा प्रवास या पक्ष्यांनी बघितला आहे. आता उत्सुकता आहे ती भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर माणूस अजून कशासाठी करतो त्याची….
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com