Wildlife Corridor Tiger Conservation BNCA
व्याघ्रसंवर्धनासाठी सर्व अभयारण्ये वन्यजीव मार्गिकेने जोडावीत Wildlife Corridor for Tiger Conservation

वन्यजीवन व व्याघ्रसंवर्धनासाठी देशातील सर्व अभयारण्ये वन्यजीव मार्गिकेने जोडावीत Wildlife Corridor for Tiger Conservation

वन्यजीवन आणि व्याघ्रसंख्यावाढीसाठी देशातील सर्वच्या सर्व अभयारण्ये ही वन्यजीव मार्गिकेने Wildlife Corridor जोडली गेली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. उमेश भगत यांनी केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील ‌‘वनजा‌’ क्लबच्या ४१ व्या सत्रात ते ‌‘मध्य भारतातील वन्यजीवनाचा विस्तार‌’ या विषयावर बोलत होते.

डॉ. भगत यांनी देशाच्या वनविभागातील भूदृश्यरचना, वन्यजीवन, अभयारण्ये,  तेथील   प्राचीन मंदिरे, नैसर्गिक व मानवनिर्मित गुहा यांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या पेंच व्याघ्र अभयारण्याची व तेथून जाणाऱ्या २९ किलोमीटर लांबीच्या ध्वनीरहीत राष्ट्रीय महामार्गाची माहिती त्यांनी सांगितली. महामार्गाखालून वन्यप्राण्यांना सुखरूप जाण्यासाठी करण्यात आलेल्या मार्गामध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पर्यावरण संवर्धनासाठी Ideas4Life

जगभरात नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक व्याघ्रदिनाचे औचित्य साधून डॉ. भगत पुढे म्हणाले की, मध्य भारतात म्हणजे मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील अभयारण्यांमध्ये  वाघांची संख्या  सर्वाधिक आहे. त्यामुळे मध्य भारतातील अभयारण्यांसह वन्यजीवांना संचार करण्यासाठी संपूर्ण देशातील सर्व २०० पेक्षा अधिक अभयारण्ये आणि ५०० हून अधिक वन्यजीव असलेली बिगर वन क्षेत्रे एकमेकांना वन्यजीव मार्गिकेने जोडणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यातून वन्यजीवांना संचार करणे शक्य होईल.

ते पुढे म्हणाले की, वन्यजीवनात वाघ वाचवणे म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचा एक मोठा घटक सुरक्षित करणे असा होतो. वनांजवळील स्थानिक व आदिवासी यांच्या सहभागातून आपली वने व वन्यजीवन सुरक्षित ठेवता येईल. वाघ हा वन  पर्यटनातील महत्वाचे आकर्षण ठरले आहे. त्यामुळे वने व वन्यजीवनांच्या संवर्धनासाठी वन पर्यटनासारख्या उपयुक्त उपक्रमांमधून  तेथील सद्य परिस्थिती देशातील नागरिकांना थेट समजावून घेता येते.

हेही वाचा: BioE3 Policy

वनामध्ये पायी गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना राहाता येतील अशी पर्यावरणपूरक निवासस्थानांचे आराखडे आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना तयार करणे शक्य आहे, असे सांगून डॉ. भगत म्हणाले की विद्यार्थी जीवनातच वन्यजीवन तसेच पर्यावरण जागृती जोपासणे आवश्यक आहे.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून  आणि ‌‘वनजा‌’ क्लबच्या समन्वयक प्रा. अस्मिता जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.  आयोजनात स्मीनल परदेशी या विद्यार्थिनीच्या सहभाग होता. प्रेरणा पवार हिने प्रास्तविक, इशिका माने हिने सूत्रसंचालन, अपूर्वा गाडवे हिने आभार प्रदर्शन केले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment