Baya Weaver होम मिनिस्टरच्या पसंतीनंतरच सुगरणी पक्ष्याचे घरटे होते फायनल..
होम मिनिस्टरच्या पसंतीनंतरच  सुगरणी पक्ष्याचे घरटे होते फायनल Baya Weaver

उत्कृष्ट वास्तूकलेचा नमुना म्हणजे सुगरणीचे घरटे. इंजिनिअरिंगची कोणती डिग्री नाही किंवा वास्तूकलेचा पुस्तकी अभ्यासही नाही, तरीही चिमणी एवढ्या आकाराच्या सुगरण पक्ष्याकडून विणलं जाणारं घरटं निसर्गाची एक उत्तम कारागिरी मानली जाते. संत बहिणाबाईंनाही सुगरणीच्या खोप्याने मोहिनी घातली. Baya Weaver.
अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला
हे अजरामर काव्य लिहून त्यांनी सुगरणीच्या घरट्याला घराघरात पोहोचवले.

आपल्याला शहराबाहेर पडल्यावर, माळरानांच्या जवळ, शेताच्या बांधाजवळी खुरट्या झाडांमध्ये, विहिरीलगतच्या बाभळी झाडांच्यावर सुगरणीची टांगलेली घरटी बघायला मिळतात. शहरांमध्ये मोजक्याच भागात, टेकड्यांवर, तलावांजवळच्या झाडोऱ्यात आजही दिसतात.

केवळ भारतातच नव्हे तर भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका अशा वेगवेगळ्या देशांमध्येही सुगरण पक्षी आढळतात. इंग्रजीमध्ये त्याला बाया व्हिवर या नावाने ओळखले जाते. नर आणि मादी दोघांचाही रंग पिंगट-तपकिरी असतो. पंख आणि शेपटी गडद तपकिरी असते. विणीच्या हंगामात नराच्या पिसांचा रंग थोडा बदलतो. सुगरण पक्षी साधारणतः कॉलनी करून म्हणजे थव्याने राहतात.
या पक्ष्यांचा विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर दरम्यान असतो. या कालावधीत ते वसाहतीसाठी जागेचा शोध, नवीन घरटे बांधणे, जोडीदाराची निवड आणि पुढे पिल्लांचे संगोपन हे सर्व सोपस्कार पूर्ण करतात.

हेही वाचा : बर्ड मॅन ऑफ ऑफ इंडिया

परिसरात मुबलक खाद्य, पाणी घरटे बांधण्यासाठी आवश्यक गवत मिळेल अशा ठिकाणी घरटे बांधले जाते. ही जबाबदारी नराकडे असते. मध्यम उंचीच्या वृक्षांच्या फांद्यावर, टोकाला ही घरटी बांधली जातात. त्यातही पाणवठ्याजवळच्या झाडांना ते प्राधान्य देतात. या पक्ष्याची हुशारी बघा… झाडाच्या फांदीच्या टोकाला घरटे बांधायचे आणि तेही पाण्याच्या दिशेने वाकलेले. कारण या पक्ष्यांचे शत्रू असलेले साप, उंदीर आणि इतर पक्ष्यांना घरट्यात शिरता येऊ नये, याचीही काळजी ते घेतात.

हा खोपा काहीसा उलट्या चंबूच्या आकाराचा दिसतो. यासाठी सुगरण पक्षी गवत, भात, केळी यांची पाने, ताड-माडाच्या झावळ्यांपासून तोडलेल्या धागेवजा पट्ट्यांचा वापर करतात. घरट्याचे कामाची सुरुवात झाली की या पक्ष्यांच्या चोचीमध्ये लांबलचक पाती दिसायला लागतात. सुरुवातीला हे घरटे एकाद्या पाईप सारखे दिसते, नंतर पक्षी त्याला खालील बाजूस घंटेसारखा, बुडाचा आकार देतो. याला अंडकोठी असेही म्हणतात. कारण घरटे पूर्ण झाल्यावर मादी तेथे अंडी घालते.

इथे आहे खरी गंमत… अंडकोठीचे काम शेवट्या टप्प्यात आले की नर पक्षी आपलं घरट बघण्यासाठी माद्यांना आकर्षित करतो. एरवी पेक्षा वेगळ्या पद्धतीने पंखाची फडफड आणि चिवचिवाट करून तो माद्यांना बोलावतो. मादी घरट्याची पाहणी करते, तिला घर पसंत असेल तरच ती नराची जोडीदार म्हणून निवड करते. आणि जोडीदार मिळाला की नरही वेगाने घरट्याचे शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण करतो. पुढचे काम दोघे मिळून करतात. अंडकोठीच्या आतील भाग ती चिखलाने लेपते. मादी एकावेळी दोन ते चार अंडी घालते. आणि पंधरा ते सतरा दिवसात पिल्लं बाहेर येतात. नराकडे पिल्लांना भरविण्याची जबाबदारी असते.

Photo Courtesy : pixabay.com

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!