मोजक्याच उरलेल्या रानम्हशींना वाचविण्यासाठी प्रजनन केंद्र
जंगलात राहणाऱ्या हत्ती, गेंडा, गवा या बलाढ्य प्राण्यांच्या यादीत अजून एका आडदांड प्राण्यांचा समावेश होतो तो म्हणजे रानम्हैस. एकेकाळी देशाच्या वेगवेगळ्या भागात रानम्हशींचा आढळ होता, मात्र आज मोजक्याच राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्त्व राहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यप्राणी संवर्धन, डॉक्युमेंटेशनसाठी काम करणाऱ्या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर IUCN या संस्थेने रानम्हशींचा Wild Buffalo संकटग्रस्त वन्यप्राण्यांच्या यादीत म्हणजेच समावेश केला आहे.
विशेष म्हणजे छत्तीसगडचा राज्यप्राणी रानम्हैस आहे. महाराष्ट्रात सध्या केवळ गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यामध्ये रानम्हशी अस्तित्त्वात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची संख्या वेगाने घटली असून सध्या केवळ वीस रान म्हशी राहिल्या असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाने काही वर्षांपूर्वी सिरोंचा तालुक्यात म्हैशींचा वावर असलेल्या कोलामारका हे खास रानम्हशींसाठी राखीव संरक्षित क्षेत्राचा दर्जा दिला आहे. पाठोपाठ त्यास अभयारण्यही घोषित करण्यात आले. आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या म्हशींसाठी आता प्रजनन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी या संदर्भात सविस्तर प्रस्ताव वन विभागाकडे सादर केला होता. राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. गडचिरोली आणि लगतच्या भागात निसर्गसंवर्धन, रानम्हशींसाठी कार्यरत अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा: वन्यजीव मंडळ बैठक
प्राथमिक माहितीनुसार नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रामध्ये रानम्हशींना आणून तिथे प्रजनन आणि नवीन पिल्लांचे संगोपन करण्यात येणार आहे. छत्तीसगड वन विभागाने यापूर्वी रानम्हशींचा प्रजनन प्रकल्पयशस्वीरित्या राबविला असल्याने याच धर्तीवर महाराष्ट्रात आता काम होणार आहे. हा प्रकल्प दीर्घकालीन असून तो कधीपासून कार्यान्वित होईल, त्याचा आराखडा लवकरच जाहीर होईल.
हेही वाचा: वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सोनवणे दाम्पत्याला यंदाचा बाबा आमटे पुरस्कार
रानम्हशींची संख्या घटली कारण रानम्हशी या सर्वाधिक ताकदवान, मोठी शिंगे असलेला वन्यप्राणी आहे. वर्षानुवर्षे होत असलेल्या शिकारी, जंगलतोड, संपुष्टात आलेले अधिवास आणि या रानम्हशींचा गावातील म्हशींबरोबर होत असलेल्या मिलनामुळे मूळ रानम्हशींची संख्या कमी झाली आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.