आपण वारंवार जंगलात, निसर्गात भटकायला लागलात की हळूहळू आपण जंगलाला वाचायला शिकतो, वेगवेगळे अनुभव कायमस्वरुपी मनात घर करून राहतात… ३५ वर्षांहून अधिक काळ जंगल भ्रमंती करणारे राजीव पंडित यांनी वेगवेगळ्या जंगलांमध्ये केलेल्या या भटकंतीवर आधारित रानबोली हे पुस्तक लिहिलय. पुण्यामध्ये नुकतच याचं प्रकाशन झालं.
वन्यजीव अभ्यासक डॉ. संजीव नलावडे यांनी रानबोली या पुस्तकाचा परिचय आपल्याला करून दिला आहे. रानबोली या पुस्तकातून एक अज्ञानी, अनुभव शून्य भटक्या ते निसर्ग अभ्यासक व संवर्धक हा प्रवास उलगडला आहे.
पुस्तकाचे पहिले प्रकरण सुरू होते ते कोयना जंगलातील भटकंतीने. पंडित यांनी आयुष्यात पहिले जंगल कोयना अभयारण्य पाहिले. जंगलाचा अनुभव नसताना या घनदाट अभयारण्यात फिरताना आलेल्या अडचणी, वन्यप्राणी जवळून पाहताना वाटलेली भीती व नंतरच्या काळात वन्यप्राण्यांचा अभ्यास करून हे जंगल बघितले. पुढे जवळपास सलग पाच वर्षे त्यांनी दर महिन्याला येथे भेटी दिल्या. याकाळात आलेले अनुभव त्यांनी लिहिले आहेत.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
पुढील काही प्रकरणे वाघ, बिबट्या व हत्ती या ‘सेलिब्रिटी’ प्राण्यांवर आहेत. पहिला वाघ केंव्हा व कसा पाहिला इथपासून नागझिऱ्यात पायी चालताना जवळून झालेले वाघाचे दर्शन तसेच कोयना अभयारण्यात मित्रांवर हल्ला करण्याच्या बेतात असलेला बिबट्या हे अनुभव थरार निर्माण करतात. हत्ती प्रकरणात मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पात आयोजित केल्या जाणाऱ्या एलिफंट फेस्टिव्हलची आणि त्या निमित्ताने हत्तींमधे दिसणाऱ्या मानवी भावनांची ह्रदय वर्णन वाचायला मिळतात.
ज्यांना लडाखला जायचे आहे त्यांनी लडाखवरील लेख आवर्जून वाचला पाहिजे. जलचर सस्तन प्राण्यांवरील लेख खूप नवीन माहिती देणारा आहे. सागरी सस्तन प्राण्यांवर मराठीत फारसे लिखाण झाले नसल्याने तसे वेगळेच आहे. एका प्रकरणात पंडित यांनी सागर किनारा, लोणारचे सरोवर, पेंगॉंग लेक, कच्छचे रण अशा विविध भूभागांवर दिसलेला पोर्णिमेचा चंद्र व त्या प्रतिबिंबाच्या अप्रतिम प्रतिमा शब्दबद्ध केल्या आहेत.
‘अन्न तारी, अन्न मारी’ या लेखात भटकंती दरम्यान अन्न वाया घालवणे, गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन, अन्नातून झालेली विषबाधा, दुर्गम ठिकाणी रूचकर भोजन मिळणे अशा विविध अनुभवांना स्पर्श केला आहे. नावांचा इतिहास या प्रकरणात गावे, दऱ्या, नाले, जागा यांची नावे कशी पडली या मागचा रंजक इतिहास वाचायला मिळतो.
‘किस्से पक्षी निरीक्षणाचे’ व ‘किस्से वन्य प्राण्यांचे’ यांमधील अनुभव छान आहेत. देशाच्या विविध अधिवासातील पक्षी निरीक्षणाचे व जंगलातील वाघ – बिबट्या – हत्ती सोडून इतर वन्यप्राण्यांच्या वागणूकीचे अनुभव या दोन प्रकरणात आहेत. जंगल भटकंती पासून सुरू झालेला प्रवास पुढे जाऊन पर्यावरण शिक्षण व संवर्धापर्यंत कसा पोहचला याचा आढावा पंडित यांनी एका लेखात घेतला आहे.
हेही वाचा: यंदाचे पक्षिमित्र संमेलन सांगली मध्ये
या प्रवासात भेटलेला मित्र अनुज खरे याच्याबरोबर राबविलेले एकत्रित उपक्रम, वन कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले प्रशिक्षण वर्ग, कोरोना काळात पर्यटन बंद झाल्याने गाईडना दिलेली मदत हा भाग वाचनीय झाला आहे.
शेवटच्या प्रकरणात २१ जुलै २०२१ या दिवशीचा थऱारक अनुभव त्यांनी लिहिला आहे. लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी पंडित पत्नीबरोबर चिपळूण परिसरात फिरायला गेले असताना ढगफुटीत सापडले. चिपळूणमध्ये त्या वेळी आलेल्या विनाशकारी पुरात सापडल्यावर बघितलेले निसर्गाचे रौद्र रूप आणि मदतीसाठी धावून आलेल्या माणसांचे मनोहारी चित्रण या लेखात आहे.
पुस्तक अतिशय ओघवत्या भाषेत लिहिले आहे. भाषाही सोपी, दररोजच्या संवादातील आहे. त्यामुळे वाचताना लेखकासोबत प्रवास करतो आहोत वा प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे असे वाटते. प्रसिद्ध छायाचित्रकारांसह अनेक छायाचित्रकारांचे रंगीत छायाचित्र व देविदास पेशवे यांची रेखीव रेखाचित्र पुस्तकाची शान वाढवतात. रमाकांत धानोरकर यांनी पुस्तकाची मांडणी अतिशय देखणी केली आहे. स्वाती पेशवे व नीलिमा सहस्रबुद्धे यांनी नेटकेपणाने पुस्तकाचे संपादन केले आहे. लेखकाकडे अनुभवाचा अफाट खजिना आहे. मराठी निसर्ग – वन्यजीव साहित्यात या पुस्तकामुळे एक मोलाची भर पडली आहे.
डॉ संजीव नलावडे, वन्यजीव अभ्यासक
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.