अरबी समुद्रात सध्या तयार झालेल्या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव देण्यात आले आहे. या वर्षीतील अरबी समुद्रातील हे पहिले चक्रीवादळ Cyclone आहे. बांगलादेशाने या चक्रीवादळाला बिपरजॉय Biperjoy हे नाव दिले आहे. बंगाली भाषेत याचा अर्थ आपत्ती.
वादळांची नावं ठरतात तरी कशी
वादळांना पूर्वी गावांची नावं दिली जात होती. ज्या गावात वादळ धडकणार, त्याच नावाने वादळ ओळखलं जात असे. आता जागतिक हवामान संघटनेकडून (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) च्या सदस्य देशांकडून वादळांच्या नावांची यादी केली जाते.
अंटार्टिक समुद्रात येणाऱ्या वादळांना नॅशनल हरिकेन सेंटर नाव देते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या वादळांना रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटरतर्फे नावे दिली जातात. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंक आणि थायलंड या देशांकडून भविष्यात येणाऱ्या वादळांची नावं आधीच सुचवली जातात. याची यादी करुन क्रमवारीने प्रत्येक वादळाला एकेक नाव दिलं जातं. त्यानुसार बांग्लादेशाने काही वर्षांपूर्वी सुचवलेले बिपरजॉय Biperjoy हे नाव क्रमवारीनुसार या वादळाला देण्यात आले आहे.
समुद्राच्या तापमानामुळे घडणाऱ्या विविध घटनांपैकी एक म्हणजे वादळ. ज्या वेळी समुद्रातील एका मध्य बिंदू भोवती म्हणजेच कमी दाबाच्या प्रदेशाजवळ चोहोबाजूंनी वारे वाहायला लागतात. त्यातून वादळ तयार होते. या वादळाची तीव्रता अधिक वाढल्यानंतर त्याला चक्रीवादळ म्हणतात. वादळांतील वाऱ्यांचा वेग किती आहे, त्यानुसार हे वादळ किती भयंकर आहे हे जाहीर केले जाते.
भाषेनुसार वादळांची नावे वेगवेगळी
जगभरात चक्रीवादळांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. वेगवेगळ्या भाषेत वादळांची ओळख स्वतंत्र आहे. उत्तर गोलार्धातील प्रदेशात म्हणजेच अटलांटिक समुद्र, कॅरेबियन समुद्र आणि पूर्व पॅसिफिक समुद्रामध्ये येणाऱ्या वादळांना हरिकेन म्हणतात. पॅसिफक समुद्राच्या पश्चिम भाग आणि चीनच्या समुद्रात येणाऱ्या वादळांना टायफून म्हणतात. ऑस्ट्रेलियामध्ये चक्रीवादळांना विली विलीस असे नाव आहे. हिंदी महासागरामध्ये ज्या वादळांची निर्मिती होते, त्यांना सायक्लोन मराठीत चक्रीवादळ म्हणतात.
तुम्हाला पाठवायचंय का नाव ?
भारत सरकारतर्फे नागरिकांनी सुचवलेलं नाव देखील निवडले जाते. त्यामुळे भविष्यात येणाऱया वादळाचं तुम्हीही नाव सुचवू शकता. त्यासाठी काही नियम आहे. मुख्य म्हणजे ते छोट, नेमक आणि गांभीर्याने सुचवलेले हवे. त्यातून कोणते वाद होणार नाहीत ना याची अभ्यासक काळजी घेतात. पूर्वी वापरलेलं नाव परत वापलं जात नाही. हटके नाव सुचवलं आणि त्या शब्दातून चांगला बोध होत असले तर ते पटकन आवडतं. वादळाचं नाव पाठविण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ मेटरॉलॉजी, इंडिया मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ हा पत्ता आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.