सोलापूर शहरातील ऑक्सीजन पातळी वाढविण्यासाठी शहरातील पाचशे एकर वनजमिनीवर वनउद्यान Forest Park उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. कर्नाटकातील विजयपूर येथे निवडणुक दौऱ्यासाठी जाण्याकरता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आज सकाळी आगमन झाले. विजयपूरला रवाना होण्यापूर्वी सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर शहरात शुध्द हवा देणारे प्रेक्षणीय स्थळ उभारण्यात यावे अशी स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यातून शहराची ऑक्सीजनयुक्त शुद्ध हवेची पातळी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शहरातील वन विभागाच्या असलेल्या पाचशे एकर जमिनीवर वनउद्यान उभारणीला मान्यता देण्यात आली आहे. सुभाष देशमुख यांनी प्रामुख्याने ही मागणी केली होती.
हेही वाचा: पक्ष्यांनाही लागते तहान
तसेच पंढरपुरात संकीर्तन सभागृह उभारण्यात येणार आहे, अशीही माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. अध्यात्मिक प्रबोधन, किर्तन हे तृप्त मनाने ऐकता यावे यासाठी या संकीर्तन सभागृहाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही ते म्हणाले.
माळढोकच्या वाढीसाठी शासनाकडून प्रयत्न
माळढोक पक्ष्याच्या वाढीसाठी शासन विशेष प्रयत्न करीत असल्याची माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या आठवड्यात नागपुरात वन खात्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद आयोजित केली असून त्यात सोलापूरच्या माळढोक पक्ष्यांच्या प्रश्नासोबतच अश्या इतर समस्यांवरही सविस्तर चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.