Olive Ridley Turtle ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांची पहिली बॅच समुद्राकडे रवाना
ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांची पहिली बॅच समुद्राकडे रवाना

रत्नागिरीतील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून या वर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांची पहिली बॅच समुद्राकडे रवाना झाली. कासव संवर्धनात सहभागी झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर हा सोहळा लाइव्ह दाखवला.

आई बरोबर नसताना पिटुकली पिल्लं धिटाईने तुरूतुरू अथांग पसरलेल्या समुद्राच्या दिशेने एकटीच चालत जाताना बघण्याचा सोहळा काही निराळाच असतो… त्यामुळेच बहुधा कोकण किनाऱ्यावर दरवर्षी बघायला मिळणारा हा सोहळा बघण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पर्यटक कासव महोत्सवात सहभागी होतात. चला तर मग या वेळी जाणून घेऊ या कासव महोत्सवा बद्दल.

समुद्राचा स्वच्छता कर्मचारी म्हणजे सागरी कासव. वर्षभर समुद्रातच राहणारी हा जीव सहसा किनाऱ्यावर येत नाही. फक्त तो जखमी झाला तरच किनाऱ्यावर वाहून येतो आणि सागरी कासवाची मादी दरवर्षी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते. साधारपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सागरी कासवांचा अंडी घालण्याचा म्हणजेच विणीचा हंगाम सुरु होतो.

हेही वाचा: बागेश्री आणि गुहाला लावल्या ॲंटिना

या कासवांमधील ऑलिव्ह रिडले या प्रकारातील कासव कोकण किनारपट्टीवर म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर येतात. पुढे दोन महिने त्यांचा हा हंगाम सुरु राहतो. या वर्षी आंजर्लेच्या किनाऱ्यावर कासवाची २२ घरटी आहेत.  

olive ridley turtle konkan
Image Courtesy: Kasav Mitra Anjarle Facebook

भारताला तब्बल आठ हजार किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ७२० किलोमीटर लांबीची आहे. सागरी जैववैविध्यही समृद्ध असून तिथेही अनेक गुपिते लपलेली आहेत. सागरी कासवांचे जीवनचक्र हे देखील निसर्गातील एक आश्चर्यच आहे.

जगभरात समुद्रामध्ये कासवांचे सात प्रकार आढळतात. भारताच्या समुद्रात त्यातील पाच प्रकरची कासवं दिसतात. ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक कासव आपल्या समुद्रात दिसते. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रकारातील कासवं अंडी घालण्यासाठी येतात. या माद्या वाळूमध्ये साधारण दीड फूट खोल खड्डा करतात. त्यात अंडी घालतात आणि समुद्रात निघून जातात. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, ओडिसामध्येही किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांची जत्रा भरते.

हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE

महाराष्ट्रात रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मारळ, रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, लाडघर, गावखडी, वेत्ये-तिवरे-आंबोळगड, माडबन, दाभोळ, कोळथरे, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वेळागर, मोचेमाड, सागरतीर्थ, वायगंणी (वेंगुर्ला), मुणगे, तांबळडेग, शिरोडा या किनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले कासव माद्या नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होते. मार्च त्यांचा विणीचा हंगाम असतो.

olive ridley turtle konkan

हेही वाचा: कासवांसाठी लढणारे भाऊ BHAU KATDARE

गेल्या काही वर्षात सागरी कासवांची संख्या वेगाने घटली आहे, त्यामुळे त्यांचा समावेश आता धोकाग्रस्त प्रजातींमध्ये Endangered Species झाला आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे किनाऱ्यावर दाखल झाल्यावर. मादी किनाऱयावर सुरक्षित ठिकाणी अंडी ठेवते आणि पुन्हा समुद्रात निघून जाते. कासवांच्या पिल्लांना पालकत्व मिळत नाही. जन्माला आली की ती समुद्राच्या दिशेने चालायला लागतात आणि अंथाग सागरात मिसळून जातात. त्यामुळे अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत ती अधिक असुरक्षित असतात. भटकी कुत्री, लांडगे, कोल्हे, शिकारी पक्षी, अनेकदा माणसही त्यांची अंडी पळवतात. समुद्रात फेकून दिलेल्या मासेमारीच्या जाळीत अडकूनही अनेक ते जखमी होतात, कधी कधी फास बसतो.

कासव पर्यटन

सागरी कासवांना वाचविण्यासाठी चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संस्थेतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतो आहे. पूर्वी गावकरीच कासवांची अंडी खाण्यासाठी घेऊन जायचे, पण या संस्थेचे प्रमुख आणि निसर्ग अभ्यासक भाऊ काटदरे यांनी गावकऱ्यांमध्ये जागृती केली आणि कासवांना वाचविण्याच्या मोहीमेत सहभागी करुन घेतले. पहिल्या वर्षी संस्थेतर्फे पन्नास घरटी सुरक्षित केली. त्यातून दोन हजार ७३४ पिल्लांना समुद्रात सोडण्यास यश आले. पुढे अजून काही गावं यात सहभागी झाली. या उपक्रमातून गावकऱयांना रोजगार मिळावा यासाठी कासव महोत्सव सुरु केला. वेगवेगळ्या शहरातील लोक कासव बघण्यासाठी गावात यायला सुरुवात झाली. स्थानिक लोकांच्या घरात पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय झाल्यामुळे गावकऱ्यांनाही रोजगार मिळाला. आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या देशातील पर्यटक कासव महोत्सवात सहभागी होतात. गावकरी कासवांच्या घरट्यांची काळजी घेतात. यासाठी दरवर्षी किनाऱ्यांवर कासवमित्र नेमले जातात. कासवांच्या अंड्यांची काळजी कशी घ्यायची याचे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रक्रिया केली जाते.

कासवांबद्दल कुतुहूल असले तर तुम्ही एकदा तरी कासव महोत्सवाचा अनुभव घेतला पाहिजे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!