अंडी घालण्यापूरती, पिल्लांना जन्म देण्यासाठी फक्त समुद्र किनाऱ्यावर येणारी ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या प्रजातीतील कासव पुन्हा समुद्रात गेल्यावर कुठे जातात, कुठे फिरतात हे जाणून घेण्यासाठी मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या तर्फे एक पथदर्शी प्रकल्प दोन वर्षांपासून राबविण्यात येतोय. सॅटलाइट ट्रान्समीटर या आधुनिक तंत्रज्ञानाची यासाठी मदत घेण्यात आली आहे.
मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या टीमने या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावरील दोन फिमेल कासवांना या संस्थांतर्फे सॅटेलाइट ट्रान्समीटर दोन दिवसांपूर्वी बसविण्यात आले. त्यांना बागेश्री आणि गुहा अशी नावं देण्यात आली आहेत. डॉ. सुरेशकुमार यांनी हे टॅगिंग केलं. संस्थांची टीम आता तंत्रज्ञानाच्या मदतीने चोवीस तास या दोघींवर लक्ष ठेवणार आहेत. या दोघी समुद्रात कुठे फिरणार, कोणकोणत्या किनार्यांना भेटी देणार याचं अभ्यासकांना कुतूहल आहे.

कासवांचा माग काढण्यासाठी या संस्थांतर्फे दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावरील दोन आणि रत्नागिरीतील दोन अशा चार ऑलिव्ह रिडले कासवांना पहिल्यांदा सॅटलाइट टॅगिंग करून पुन्हा समुद्रात सोडले होते. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता. सावनी, रेवा, प्रथमा आणि लक्ष्मी अशी त्यांची नावं ठेवली होती.
हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE
लक्ष्मीची माहिती आठवडाभरच मिळाली नंतर ती रेंजच्या बाहेर गेली. सिग्लन मिळणे पूर्ण बंद झाले, याचे नेमकेकारण समजू शकले नाही. प्रथमाने दोन महिन्यातच समुद्रातून अडीचशे किलोमीटर अंतर पार केलं होत. सावनीची माहितीही काही महिने मिळत राहिली.
आता गुहागरच्या किनाऱ्यावर अजून दोन ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला आहे.

पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ‘ॲंटिनावालं कासव’ ही डॉक्युमेंटरी केली आहे. यामध्ये प्रकल्पाची छान माहिती बघायला मिळते. या प्रकल्पाबद्दल कुतूहल असेल तर नक्की ही डॉक्युमेंटरी बघितली पाहिजे.
हेही वाचा: माळढोक वाचविण्यासाठी BREEDING CENTER
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.