आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या बिबट्याचा भाऊबंद असलेला हिमबिबट्या हा एक देखणा आणि रुबाबदार प्राणी. एकीकडे हिमबिबट्या Snow Leopard दुर्मिळ होत असल्याच्या बातम्या सारख्या पुढे येत असताना उत्तराखंडमध्ये दारमा खोऱ्यात पहिल्यांदाच हिमबिबट्याचे दर्शन झालय. जाणून घेऊ या हिमबिबट्याच्या घडामोडींबद्दल…
बर्फाळ प्रदेशात राहणारा, अतिशय देखणा, पण गेल्या काही वर्षात दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेला हिमबिबट्या हे भारताला मिळालेले एक वैभवच… आनंदाची बातमी म्हणजे उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील दारमा खोऱ्यात सुमारे ११ हजार १२० फूट उंचीवर पहिल्यांदाच हिमबिबट्याचे दर्शन झाल्याचं तेथील वन अधिकाऱ्यांनी नुकतच जाहीर केलंय.
हिमबिबट्याला समृद्ध निसर्ग, प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या प्रदेशाचे इंडिकेटर किंवा प्रतिक मानले जाते. त्यामुळे पिथौरागडमधील हिम जंगलाच्या दृष्टीने आणि अभ्यासकांसाठी ही कौतुकाची बाब ठरली आहे.
पिथौरागडचे विभागीय वनअधिकारी (डीएफओ) मोहन डागरे यांनी सांगितले की, हिमालयांतील पर्वतरागांमध्ये उंचावर राहणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शोधात असलेल्या संशोधकांच्या पथकाला ६ फेब्रुवारीला दारमा गावाच्या वर बर्फाळ प्रदेशात हिमबिबट्याचे दर्शन झाले. सुमारे २० मीटर अंतरावरून हिमबिबट्याला संशोधकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. एवढ्या उंचीवर हिमबिबट्या सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे डागरे यांनी सांगितले.
हेही वाचा: कोट्यावधी रुपयांची व्हेल माशाची उलटी ??
हिमबिबटे साधारणपणे १२००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर आढळतात, तर डार गाव सुमारे ११,१२० फूट उंचीवर आहे. डीएफओने सांगितले की, उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे हा प्राणी त्याच्या सामान्य अधिवासातून खाली उतरला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
यापूर्वी गढवाल हिमालयातील नंदा देवी पर्वतरांग, हिमाचल प्रदेशचा काही भाग आणि लडाख भागात हिमबिबट्या दिसला होता. स्थानिक भाषेत औंस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमबिबट्याला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.
हेही वाचा: निसर्गप्रेमाचे केले करिअरमध्ये रूपांतर SIR DAVID ATTENBOROUGH
हिमबिबट्याची माहिती
हिमबिबट्या जगात मोजक्याच देशात आढळतात. मध्य आणि दक्षिण आशियात भारत, रशिया, चीन, भूतान, ताजिकिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि मंगोलिया अशा बारा देशांमध्ये हिमबिबट्याचे वास्तव्य आहे. जगभरात त्यांची संख्या दहा ते बारा हजार असावी असं अभ्यासक सांगतात. शेळी आणि मेंढीच्या जातीतील भरल, आयबेक्स आणि अर्गल या अतिउंचीवर राहणारे वन्य प्राणी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
भारतामध्ये त्यांची भौगोलिक व्याप्ती जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह पश्चिम हिमालयातील बऱ्याच भागात आहे. हिम बिबट्या व त्याच्या अधिवासाचे संरक्षण केल्यास हिमालयातील मोठ्या नद्यांचे संरक्षण होतेच, शिवाय संवदेनशील परिसंस्थेचेही संवर्धन करता येते. हिम बिबट्यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यांच्या गुबगुबीत आणि तलम अशा कातड्याला खूप मागणी असल्याने हिमबिबट्यांची मोठ्या प्रमाणात शिकारही केली जाते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हिमबिबट्यांची संख्या दिवसेदिवस कमी होते आहे. हिम बिबट्यांना वाचविण्यासाठी सध्या भारतात “हिमलसंरक्षक” हा प्रकल्प राबविण्यात येतो आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.