देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्फे भारतातील सर्व ७५ रामसर स्थळांवर World Wetland Day जागतिक पाणथळ दिनानिमित्त २०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना पाणथळ जागांच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. जागतिक पाणथळ दिनानिमित्त विविध Ramsar Sites रामसर ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नवीन माहिती करून देण्याच्या उद्देशाने आयोजित विविध कार्यक्रम तसेच पक्षीनिरीक्षण इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते.
२९ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणथळ जागांच्या सहभागात्मक व्यवस्थापनावर अधिक भर दिला होता. या जागांच्या जतन आणि संवर्धनात स्थानिक समुदायांच्या अनमोल भूमिकेचे देखील त्यांनी ठळकपणे वर्णन केले होते. पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या विचारांना अनुसरून जागतिक पाणथळ दिन साजरा करण्याची संकल्पना राबवण्यात आली.
महाराष्ट्रात देखील जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यासाठी लोणार, नांदूरमधमेश्वर आणि ठाणे या तीन रामसर स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने २ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार तलावाच्या परिसरात वन खात्यातर्फे स्वच्छता मोहीम तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम राबवला.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित पक्षी Flamingos येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.
हेही वाचा: मेळघाट परिसरात तीनशे हून अधिक प्रजातींचे पक्षी !!
नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात २ फेब्रुवारी २०२३ रोजी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यातील खुल्या संवादवजा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या ७५ रामसर स्थळांपैकी नांदूरमधमेश्वर हे २८ व्या क्रमांकाचे रामसर स्थळ आहे तर महाराष्ट्रातील ३ रामसर स्थळांपैकी प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. सुमारे ११९८.६५७ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात ५३६ प्रकारच्या जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती आढळतात. तसेच येथे ७ प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, ३०० जातींचे पक्षी, २४ प्रकारचे मासे आणि तब्बल ४१ प्रकारची फुलपाखरे आढळतात.
ठाणे येथे असलेल्या फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात जागतिक पाणथळ दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठान आणि ग्रीनएडर्स संस्था यांच्यातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
रामसर स्थळ म्हणजे काय ?
इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९० % देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने हा करार ०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वीकारला.
स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
रामसर परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ: www.ramsar.org
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.