बहुगुणी हळद हत्तींवरही प्रभावी !!
बहुगुणी हळद हत्तींवरही प्रभावी..

तळपायाला पडणाऱ्या भेगा दूर कशा करायच्या ही तमाम महिला वर्गाला जाणवणारी समस्या हत्ती सारख्या अजस्त्र प्राण्यालाही भेडसावते. यावर एक भन्नाट उपाय एसओएस वाइल्डलाइफ संस्थेने शोधला आहे.

भारतीय परंपरा, आहार संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली हळद Turmeric आणि वनौषधींचा अलीकडे वन्यप्राण्यांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर, Wildlife SOS संस्था हत्तींची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक औषधी (Herbal Medicines) उपचारांची मदत घेत असल्याचे त्यांनी एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

संस्थेतील तज्ज्ञ हत्तींच्या पायाला पडणाऱ्या भेगा आणि त्यातून त्याला होणाऱया वेदना कमी करण्यासाठी ओल्या हळदीच्या मिश्रणापासून तयार केलेला आयुर्वेदिक लेपाचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे हे उपचार इतर औषधांप्रमाणेच गुणकारी आणि प्रभावी ठरत असल्याचे संस्थेच्या रुही नरूला यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

वाइल्डलाइफ एसओएस ही संस्था देशभरात हत्तींचे संवर्धन, पुनर्वसनाचे काम करते. आपल्या देशात सर्रास वापरल्या जाणाऱ्या हळदीला आयुर्वेदात हरिद्रा म्हणतात. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वीच बहुगुणकारी हळदीचे औषधी गुणधर्म ओळखले आणि वेगवेगळ्या माध्यमातून तिचा आहारात वापर सुरू केला. त्याच काळात हळदीचा औषधांमध्येही वापर सुरू झाला. आजही कोणालाही जखम झाली तर पटकन त्यावर हळद लावण्याची सवय कायम आहे. रस्त्यावर जखमी अवस्थेत एखादा, प्राणी, पक्षी सापडला तर नागरिक पहिल्यांदा त्यावर हळदची पूड टाकतात.

हेही वाचा: कासवांसाठी लढणारे भाऊ – BHAU KATDARE

जर्द पिवळा रंग असलेली हळद जंतूनाशक आहे. जखमेवर हळद लावल्यास रक्तस्त्राव थांबतो, दाह कमी होतोच शिवाय हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो. याच विचारातून एसओएस संस्थेतर्फे हळद इतर औषधांमध्ये मिसळून हत्तींवर विविध आजार बरे करण्यासाठी वापरली जाते. अनेकदा संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी हत्तींच्या नियमित आंघोळीतही हळदीचा वापर करतात.

image courtesy: https://wildlifesos.org/

संस्थेकडे दाखल होणारे बहुतांश हत्ती वेगवेगळ्या प्रकरणातून सोडवून आणलेले असतात. अनेकदा ते शारीरिक दृष्ट्या सुदृढ नसतात. यातील अनेक हत्तींना शहरात वर्षानुवर्षे गरम रस्त्यांवरून सतत चालत असल्याने तळपायांना गंभीर भेगा पडलेल्या असतात. काहींना तर या जखमांमुळे चालणेही अशक्य असते. त्यामुळेच संस्थेतील डॉक्टर हत्तींच्या पायांची जास्त काळजी घेतात. मॅग्नेशियम सल्फेटमध्ये मिसळलेली हळद या हत्तींसाठी परफेक्ट फूटबाथ तयार करते आणि त्यांना तत्काळ आराम देते.  हळदीबरोबरच कोरफड देखील बहुउपयोगी असल्याने आपल्याकडे आहार, वैद्यकीय उपचार आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीच्या गराचा सर्रास वापर केला जातो.

हेही वाचा: महिनाभरात डझनभर चित्ते येणार भारतात !

कोरफडीच्या गरामध्ये अमिनो ॲसिड, जीवनसत्व, कॅल्शियमसह ७५ हून अधिक गुणधर्म ज्ञात आहेत. त्यामुळेच वाइल्ड लाइफ एसओएस हत्ती संवर्धन आणि उपचार केंद्रात कोरफड वाढवली जाते. ताज्या कोरफडीचा उपयोग प्राण्यांसाठी केला जातो. हत्तींच्या पायाच्या नखांवर ताजी कोरफड लावली जाते. तसेच हळदीमध्ये मिसळून हत्तींच्या फोडांवर किंवा फूटपॅडवर लावला जातो. त्याच्या जेलसारख्या सुसंगततेमुळे हत्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागात पसरवणे सोपे होते.  पुरळ, किरकोळ कट किंवा ॲलर्जीशी झगडणाऱ्या हत्तींच्या कानावर कोरफडचा लेप लावला जातो. गुळ, ओवा (carom seeds) आणि हळद यांचे आयुर्वेदिक मिश्रण तयार करून आपल्या हत्तीच्या आहारात समाविष्ट केले जाते. हे केवळ पचनास मदत करत नाही तर हत्तींना शरीरातील उष्णता वाढवून उबदार राहण्यास देखील मदत करते, असा अनुभव नरुला यांनी त्यांच्या संस्थेच्या वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉगवर शेअर केला आहे. अलोपॅथी, वैद्यकीय उपचारांच्या बरोबरीने पारंपरिक, नैसर्गिक औषधांचे पर्याय मिळाल्याने प्राण्यांना निश्चितच त्याचा उपयोग होतो आहे, एवढे मात्र नक्की.

संदर्भ: Healing Through Nature: Herbal Remedies at Wildlife SOS! – Wildlife SOS

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!