नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांची पहिली बॅच कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) स्थिरावत असतानाच आता फेब्रुवारीमध्ये अजून एक डझन चित्ते भारतात येणार आहेत.
कुनो अभयारण्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे. एस. चौहान यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकी चित्त्यांची दुसरी तुकडी ग्वाल्हेर येथे हवाईमार्गे आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना कुनो येथे आणले जाईल. या १२ चित्त्यांमध्ये नर आणि माद्यांची संख्या नेमकी किती आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आफ्रिकी चित्त्यांना येथील वातावरणात रुळण्यासाठी महिनाभर विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या करारानुसार १२ चित्त्यांची ही तुकडी भारतात दाखल होणार आहे. या चित्त्यांसाठी विलगीकरणातील दहा ‘बोमा’ (बंदिस्त भाग) तयार केले आहेत.
भारतातून नामशेष झालेल्या चित्यांना पुन्हा एकदा नव्याने वसविण्यासाठी, पुनर्वसनासाठी (Reintroduce) करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने प्रोजेक्ट चित्ता प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानाची निवड केली आहे. सप्टेंबर महिन्यात नामिबियातून आठ चित्त्यांची पहिली बॅच कुनोमध्ये दाखल झाली. सुरुवातीला त्यांना विशेष संरक्षित क्षेत्रात देखऱेखीखाली ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्याने त्यांना मोकळीक देण्यात आली. हे चित्ते आता नैसर्गिक वातावरणात स्थिरावल्याने पुढच्या बॅच म्हणजेच अजून बारा चित्ते आणण्याची तयारी गेल्या महिन्यात सुरू झाली होती. भारत सरकारचे वन मंत्रालय आणि नामिबियातील वन विभागाच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी नव्या बॅचच्या चित्त्यांसाठी सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे पुढची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बिबट्यांचा अभ्यास करणाऱ्या विद्याला तुम्ही ओळखता का ?
जगातील सर्वात वेगवान अशी या प्राण्याची ओळख आहे. जगभरात सध्या दक्षिण आफ्रिका, नामिबिया भागात सर्वाधिक संख्येने चित्ते वास्तव्यास आहेत. भारतात सत्तर वर्षांपूर्वी पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. शिकारी आणि त्यांची वसतिस्थाने लूप्त झाल्याने चित्ता भारतातून नामशेष झाला. काही वर्षांपूर्वी सरकारीपातळीवर भारतात चित्त्यांच्या पुनर्वसनाची कल्पना मांडली गेली. पण त्याला राहण्यासाठी, फिरण्यासाठी लागणार प्रशस्त माळरान आणि मुबलक खाद्य लागते. मग, हे सगळे कुठे मिळू शकते, यासाठी भारत सरकारचा बरेच वर्षे अभ्यास सुरू होता. सुरूवातीला मध्यप्रदेशबरोबरच झारखंड आणि राजस्थानमधील काही जागांची प्राथमिक फेरीत निवड झाली होती. पण सर्व परीक्षांमध्ये मध्य प्रदेशाच कुनो पालापूर नॅशनल पार्क उत्तीर्ण झाले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आठ चित्त्यांची पहिली बॅच दाखल झाली.
आता १८ फेब्रुवारी ला अजून बारा चित्ते भारतवासी होण्यासाठी येत आहेत. पुढील दहा वर्षे हा उपक्रम सुरू राहणार असून दर काही वर्षींनी या प्रकल्पाचे मूल्यांकन आणि नवीन बदल ठरवले जातील, असे भारत सरकारने निवेदनातून स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: सर्पमित्रांचा झाला पद्मश्री पुरस्काराने सन्मान
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.