भरडधान्य हे गरिबांचे धान्य असा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्याने त्याकडे हवे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही. भविष्यात साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी सक्षम होण्यासाठी भरडधान्यच Millets आपले तारणहार होऊ शकते. त्यामुळे भरडधान्य आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे आहे, असे मत बायफ या स्वयंसेवी संस्थेचे विश्वस्त आणि मुख्य सल्लागार गिरीश सोहोनी यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित १६ व्या ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (KVIFF) पत्रकार संघ येथे आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात सोहोनी बोलत होते.
भरडधान्याची जागा गहू-तांदुळांनी घेतली आहे. परंतु, केवळ गहू-तांदूळ तुम्हाला सशक्त आणि पोषणमूल्य देणारे अन्नधान्य ठरू शकत नाही. त्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राजगिरा यासारख्या भरडधान्यातून आपल्याला लोह, फायबर, कॅल्शियम मिळते. हे भरडधान्य आपल्या रोजच्या आहारातील घटक बनले पाहिजे. पर्यावरणाचा ढासळता आलेख आणि वैज्ञानिकांनी केलेले भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगांचे भाकीत लक्षात घेता आपल्याला भरडधान्याविषयी समग्र आणि सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे. भरडधान्याचे स्थानिकीकरण निश्चित करून त्याच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आजही आदिवासी भागामध्ये भरडधान्य मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. शहरी अन्नसाखळीमध्ये केवळ पोट भरणे, याला दिले जाणारे महत्त्व चुकीचे असून पोट भरण्याबरोबर पोषण देखील महत्त्वाचे आहे. आपल्या अन्नसाखळीत भरडधान्याचा अभाव असल्याने आपले कुपोषण होत असून हे थांबणे आवश्यक आहे अशी भूमिका गिरीश सोहोनी यांनी मांडली.
MTDC साजरे करणार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष
यावेळी बोलताना मोहन गुप्ते म्हणाले की, साथीच्या रोगांवर अनेक वर्षे काम करूनही त्यांचे समूळ उच्चाटन झाले, असे आपण म्हणू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदरशक तत्वांनुसार आपण त्या रोगांवर नियंत्रण मिळवत असलो, तरी त्या रोगांचे समूळ उच्चाटन हे ध्येय साधता आले पाहिजे. साथीच्या रोगांच्या उच्चाटनात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकांमध्ये शिस्त आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे असे मत मोहन गुप्ते यांनी व्यक्त केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य सेवेत सक्रियपणे कार्यरत असलेले आणि क्षयरोग, कुष्ठरोग संशोधन आणि साथीच्या रोगांच्या तपासण्यांमध्ये योगदान देणारे यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी डॉ.मोहन गुप्ते, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे आणि महोत्सव संयोजक विरेंद्र चित्राव उपस्थित होते. विरेंद्र चित्राव यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com