वाघ, बिबट्या, हत्ती या सांरख्या जंगलातल्या मोठ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी अनेक अभ्यासक काम करतात. वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनीच जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या भागात राहाता, त्या परिसरात, जवळच्या वनक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या एखाद्या वन्यप्राण्याच्या संवर्धनासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. या अंकात आपण चिमुकल्या कासवांचे संवर्धन करणाऱ्या भाऊंची Bhau Kardare ओळख करून घेणार आहोत.
टीम निसर्गरंग
info@nisargaranga.com
कोकणातील सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे प्रमुख असलेल्या भाऊंना अनेक वन्यजीव अभ्यासक ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांचा तारणहार म्हणून ओळखतात. भाऊंचे पूर्ण नाव विश्वास काटदरे.. गुहागरमधील शिर हे त्यांचे मूळ गाव, तर चिपळूण ही कर्मभूमी.
वेळास या गावात त्यांनी निसर्ग संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. समृद्ध निसर्ग आणि प्रशस्त समुद्र किनारा लाभलेल्या या गावामध्ये वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी समुद्री कासवांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असे. स्थानिक लोक ही अंडी फस्त करीत असल्याचे भाऊंच्या लक्षात आले. त्यांनी जवळच्या काही निसर्गमित्रांना एकत्र आणून अंडी फस्त कोण करते, याची शोधमोहीम सुरू केली. हे करताना त्यांना ऑलिव्ह रिडले या कासवाचे अंडे किनाऱ्यावरील रेतीमध्ये सापडले.

ऑलिव्ह रिडले या कासवासांसाठी ओडिशाचा किनारा जगप्रसिद्ध आहे. वर्षभर समुद्रात राहणारी ही कासव अंडी घालण्यासाठी ओडिशाच्या किनारपट्टीवर येतात. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांत कासवांचे प्रजनन धोक्यात आले. ऑलिव्ह रिडले जातीचे कासव वेळासच्या किनारपट्टीवर सापडल्यावर त्याला वाचविण्यासाठी काही तर केले पाहिजे, असं भाऊंना मनोमन वाटू लागलं. त्यांनी मित्रांना एकत्र आणून या कासवांबद्दल गावात जनजागृती करण्याचे ठरवले. लोकांनी मनावर घेतले तरच कासवांच्या पिल्लांची अंडी सुरक्षित राहतील, हे भाऊंना माहिती होतं. सुरुवातीला त्यांच्या टीमला लोकांकडून वाईट अनुभव आले. लोकांना गांभीर्य कळाले नाही, पण भाऊंच्या टीमने हार मानली नाही. अखेर संपूर्ण गाव कासवांसाठी भाऊंच्या मागे उभा राहिले. यातूनच १९९२मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था स्थापन झाली. हळूहळू इतर गावातील मंडळीही संस्थेत सहभागी झाली.
अंडी घालण्यासाठी खास आपल्या किनाऱ्यावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवाला वाचविणारी मोठी फौजच तेथे उभी राहिली. कासवांनी रेतीमध्ये अंडी घातली, पिल्लं बाहेर येईपर्यंत लोकांनी तिथे गस्त घालायला सुरुवात केली. यातूनच कासव महोत्सव ही कल्पना पुढे आली. शहरातील लोकांना कासव अंडी कसे घालते, आई नसतानाही अंड्याला ऊब कशी मिळते, जन्माला आल्यावर पिल्लू स्वतः उल्लेखनीय उपक्रम राबवले. हून कसे महाकाय समुद्रामध्ये तुरूतुरू चालत जाते.. हे शहरातील लोकांना बघायला नक्कीच आवडेल, असे त्यांना वाटले.

पर्यटकांची निवास आणि भोजन व्यवस्था केल्यास गावकऱ्यांनाही रोजगार मिळेल, असा विचार करून भाऊंच्या संस्थेने सुरुवातीला वेळासमध्ये कासव पर्यटन सुरू केले. त्यामुळे गावकरीही खूष झाले. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यातून आणि परदेशातूनही पर्यटकांचा या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वीस वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. यातून हजारो कासवांची पिल्लं सुखरूप समुद्रात सोडण्यात आली आहेत.
पुढे कोकणातील इतर गावांनीही हा उपक्रम सुरू केला. कासव संवर्धनाची घडी बसल्यावर भाऊंनी समुद्री गरूड, गिधाड, खवले मांजर यांच्यासह कोकणातही जैवविविधता संवर्धनासाठीही विविध उल्लेखनीय उपक्रम राबवले. गावकऱ्यांच्या सहभागातून काम केल्यास संवर्धनाची व्याप्ती वाढते, त्यातून दिसणारे परिणाम चिरकाल टिकतात, असे भाऊंचे ठाम मत आहे. साधी राहणी, सहज- सोपं बोलणं, लोकांमध्ये पटकन मिसळून जाणे या भाऊंच्या स्वभावामुळे ते सगळ्यांना जवळचे वाटतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सँक्च्युअरी एशिया या संस्थेने त्यांना वाइल्ड लाइफ सर्व्हिस अवॉर्डने गौरवले आहे. याशिवाय राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com