पर्यावरण या विषयात चांगलं काम करण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची किंवा आणखी कसलीच अट नसते. शिवाय, पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसावं लागतं, असंही काही नाही. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही कोणत्याही वयात पर्यावरणासाठी छानसं काम करू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सीड मदर राहीबाई पोपेरे… त्यांच्या अनोख्या कामाची माहिती आज घेऊ या.
टीम निसर्गरंग
info@nisargaranga.com
राहीबाई पोपेरे हे नाव तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असेल तर उत्तमच पण ऐकलं नसेल तरीही काही हरकत नाही. त्यांचीच माहिती आपल्याला आज घ्यायचीय. तर राहीबाई पोपेरे यांना आता ‘सीड मदर’ अर्थात बीजमाता ही नवी ओळख मिळाली आहे. म्हणजे काय, ते आता पाहू या.
आपल्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात कोंभाळणे या छोट्याशा खेड्यात राहीबाई राहतात. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या पर्यावरण अभ्यासकांपर्यंत त्यांचं नाव पोहोचलं आहे. कारण त्यांनी आपल्याकडे पिकवल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या, अन्नधान्यांच्या पारंपरिक, स्थानिक जातींच्या बियांचं जतन करण्याचा, म्हणजेच त्या जपून ठेवण्याचा छंद जोपासला आहे. त्या कोणतंही रसायन वापरता म्हणजे सेंद्रिय शेती करतात. आपल्या या कृतीतून राहीबाईंनी गेल्या १५ वर्षांत सेंद्रिय शेती आणि पारंपरिक बियाण्याचं महत्त्व लोकांसमोर मांडलं आहे.
जगभरात सध्या शेतीसाठी वापरलं जाणारं विविध पिकांचं बियाणं संकरित किंवा प्रयोगशाळेत अनेक प्रक्रिया करून विकसित केलं जातं. अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी दोन वेगवेगळ्या जातींचा संकर केला जातो; मात्र त्यातून उत्पादन अधिक मिळत असलं, तरी त्या धान्यात पुन्हा रुजण्याची क्षमता असत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दर वर्षी नवं बियाणं विकत घेण्यासाठी अवलंबून राहावं लागतं. तसंच, रसायनांच्या वापरामुळे जमिनीच्या गुणवत्तेवर, माणसाच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतात, असं आढळून आलंय. त्यामुळे राहीबाईंनी स्थानिक म्हणजेच आपल्या प्रदेशात जुन्या काळापासून पिकत आलेल्या जातींच्या बियाण्यांचा वापर करण्याची आणि शेतीत रसायनं न वापरण्याची चळवळ सुरू केली. असं केल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान टाळता येणार आहे आणि आपल्या आहारासाठीही दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.
यासाठी त्यांनी कोंभाळणे या आपल्या गावात पारंपरिक बियाणांची पेढी म्हणजेच सीड बँक तयार केली आहे. त्या वेगवेगळ्या आवाहन गावात जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि पिकांच्या पारंपरिक जातींचं महत्त्व पटवून देत आहेत.
राहीबाई यांचा जन्म याच कोंभाळणे या छोट्याशा गावात झाला. राहीबाईंना आठ भावंडे होती. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने राहीबाईंना पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान असल्यापासून त्या शेतीत वडिलांना मदत करायला शिकल्या. लग्न झाल्यावर शेतीकडे थोडं दुर्लक्ष झालं; पण तरीही वेळ मिळेल तेव्हा त्या शेतात काम करायच्या. काही वर्षांपूर्वी घरात नव्या बियाण्यांबद्दल चर्चा सुरू झाली. हळूहळू कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याच्या तक्रारी वाढायला सुरुवात झाली. त्याच वेळी त्यांनी ठरवलं, की शेतात पीक कमी आलं आणि उत्पन्न कमी झालं तरी चालेल; पण संकरित ( हायब्रीड ) बियाणं आपण वापरायचं नाही. राहीबाईंनी शेतीत लक्ष घातलं. सगळी शेती पूर्वजांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी गावातल्या बचत गटांमध्ये जागृती केली आणि पिकांच्या देशी जातींचा प्रचार सुरू केला. संकरित पिकांमुळे होत असलेल्या आजारांची माहिती दिली. नातेवाईक आणि परिचयातल्या व्यक्तींनाही त्या देशी बियाणं वापरण्याचं करायला लागल्या. सरकारी संस्थांनीही त्यांना मदत केली. संक्रांतीला हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमातही त्यांनी महिलांना, बचत गटातल्या सभासदांना वस्तू देण्याऐवजी देशी वाणाचं बियाणं किंवा रोप देण्यास सुरुवात केली.
या काळात त्यांनी विविध गावांत जाऊन बियाण्यांचा संग्रह सुरू केला. बघता बघता दहा वर्षांत त्यांच्याकडे स्थानिक फळं, भाजीपाला, धान्याच्या बियाण्याची अनोखी सीड बँक तयार झाली. आपण बँकेत पैसे साठवून ठेवतो ना, तसंच इथे त्यांनी बियाणं साठवून ठेवलं आहे, म्हणून ती सीड बँक. शेणाने सारवलेली ही सीड बँक आवर्जून बघण्यासारखी आहे.
वरई, नाचणी, भात या अन्नधान्य पिकांबरोबरच, गोड वाल, कडू वाल, हिरवा-लाल घेवडा, वाटाणा, काळ्या शिरांचा घेवडा अशा विविध प्रकारच्या फळभाज्यांचं उत्पादन त्या घेतात. घराबाहेरच्या बागेत त्यांनी चारशेपेक्षा जास्त झाड लावली आहेत. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन इतर महिला बचत गटांनीही आता आपापल्या स्वतंत्र सीड बँक उभारल्या आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या या कामाची दखल बीबीसी वा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनेही घेतली असून, जगभरातील शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत राहीबाई पोपेरे यांचा समावेश केला आहे. २०२० साली राहीबाई पोपेरे यांना सरकारने पद्मश्री या पुरस्कारानं गौरवलं आहे. राहीबाईंचे काम बघण्यासाठी विविध स्तरांतल्या व्यक्ती भेट देत असतात. त्यात शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. तुम्हीही जरूर पाहून या.
लेकराला जपते ती आई आणि पारंपरिक बियाण्याला लेकरासारखं जपते ती बीजमाता… म्हणूनच राहीबाईंना बीजमाता अर्थात सीड मदर ही ओळख मिळाली आहे. तुम्हीही कधी तरी आवर्जून जवळपासच्या शेतावर जा, शेतकऱ्यांकडे साठवलेलं एखाद्या फळभाजीचं थोडंसं बियाणं घेऊन या आणि योग्य हंगामात कुंडीत लावून बघा. तुमच्या घराच्या आसपास जागा असली तर उत्तमच… पण इमारतीत राहत असलात, तर बाल्कनीतल्या जागेतही हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. योग्य काळजी घेतलीत, तर तुमच्या कुटुंबाला एकदा पुरेल एवढी तरी भाजी नक्की मिळेल. त्यातला आनंद वेगळाच असतो. त्यातलंच एखादं पिकलेलं फळ साठवून ठेवा. म्हणजे पुन्हा पुढच्या हंगामातही तुम्हाला त्याची लागवड करता येईल. हे कसं करायचं, याची माहिती शेतकऱ्यांकडूनच घ्या. हे करून पाहिलंत की तुम्हाला राहीबाईंच्या कामाची कल्पना येईल. मग करून पाहणार ना!
आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com