निसर्गाबद्दल असलेली आवड आणि त्यातच काहीतरी वेगळं करून दाखविण्याचे ध्येय एखाद्या व्यक्तीला किती उंचावर घेऊन जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर डेव्हिड अटेनबरो. वन्यप्राणी, पक्षी, निसर्ग अगदी समुद्रातील दुर्मिळ जीवांवर माहिती देणारे जगप्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती करण्यामध्ये अटेनबरो यांचे नाव आदराने घेतले जाते. अटेनबरो यांनी आता वयाची नव्वदी ओलांडली आहे, पण त्यांचा उत्साह, निसर्गाबद्दलच कुतुहूल आजही कमी झालेलं नाही.
टीम निसर्गरंग
info@nisargaranga.com
अटेनबरो हे मूळचे लंडनचे…. त्यांचा जन्म लंडनमधील इलेझवर्थ या ठिकाणी झाला. त्यांचे वडील लिसेस्टर विद्यापीठात प्राचार्य होते. या विद्यापीठाच्या आवारातील निसर्गानेच सर डेव्हिड यांच्या करिअरला दिशा दिली. डेव्हिड लहानपणी या विद्यापीठाच्या आवारात खेळायचे. फिरताना रंगीबेरंगी दगड, कधी पक्ष्यांची अंडी, घरटी, लहान-मोठ्या प्राण्याचे अवशेष गोळा करायचे.
डेव्हिड सात वर्षांचे असताना त्यांनी घराच्या कोपऱ्यात स्वतःचे संग्रहालय साकारले होते. यामध्ये जीवाश्म आणि वेगवेगळ्या दगडांचे असंख्य प्रकार त्यांनी गोळा केले होते. या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी डेव्हिड यांचे खूप कौतुक केले होते. अभ्यासापेक्षा जास्त वेळ ते निसर्गात भटकंती करण्यातच घालवत होते. एकीकडे संग्रहालयाचे काम चालू असतानाच डेव्हिड यांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी निसर्ग अभ्यासक ग्रेऑउल या संशोधकाचे व्याख्यान ऐकले. यातून त्यांना निसर्गासाठी आपण काही तरी केले पाहिजे, याची प्रेरणा मिळाली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात निसर्ग विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे त्यांनी १९४९मध्ये बीबीसीमध्ये कामाला सुरुवात केली. निसर्ग अभ्यासक ज्युलियन हक्सले यांच्याबरोबर डेव्हिड यांनी प्राणी, वनस्पती आणि खनिजे यांच्यासंबंधी कार्यक्रम सुरू केले. काही वर्षातच त्यांनी बीबीसीची नोकरी सोडली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये सामाजिक मानवजातिशास्त्र या विषयाच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला.
अभ्यास सुरू असताना बीबीसीने पुन्हा त्यांना आमंत्रण दिले. नव्या उत्साहाने काम सुरू केले, पण जंगलाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. पुन्हा त्यांनी बीबीसीची नोकरी सोडली. मुक्तपणे निसर्ग, पर्यावरण, जंगलजीवन अशा, विविध विषयांवर विविध चॅनेलसाठी त्यांनी डॉक्युमेंट्री बनवायला सुरुवात केली. लाइफ ऑन अर्थ, द लिव्हिंग प्लॅनेट लाइफ इन द फ्रिझर, द प्रायवेट लाइफ ऑफ प्लांट, द लाइफ ऑफ बर्ड्स अशा अनेक डॉक्युमेंट्री त्यांनी बनविल्या. या सर्व डॉक्युमेंट्री जगभरात लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या या कामामुळे सर्वसामान्य लोकांना, मुलांना निसर्गातील अनेक रहस्य बघायला मिळाली. यातून अनेकांना निसर्गाबद्दल आकर्षण आणि कुतूहल निर्माण झाले. सहज आणि सोप्या भाषेतून अवघड विषय सांगण्यात सर डेव्हिड यांचा हातखंडा आहे.
निसर्ग शिक्षणाच्या त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी ऑर्डर ऑफ मेरिट हा मानाचा ब्रिटिश पुरस्कार सर डेव्हिड यांना प्रदान केला. त्यांचा आदर्श घेऊन मोठ्या झालेल्या संशोधकांनी नव्याने शोध लावलेले प्राणी, पक्षी, कीटकांना सर डेव्हिड यांचे नाव दिले आहे. ब्रिटिश विद्यापीठांकडून सर डेव्हिड यांना २०१३ पूर्वी तीसहून अधिक मानद पदव्या मिळाल्या. केंब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानाच्या पदवीने त्यांना सन्मानित केले. प्राणी, पक्षी बघून का मोठं होता येतं.. अशी विचारसरणी असलेल्या काळात डेव्हिड यांनी त्यांच्या छंदाचे चांगल्या करिअरमध्ये रुपांतर केले.
आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com