पर्यावरणासाठी झगडणारी ग्रेट ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg
पर्यावरणासाठी झगडणारी ग्रेट ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg

निसर्गाचा शास्त्रीय अभ्यास करून त्या विषयात संशोधन करून नवनवीन गोष्टींचा शोध लावणारे संशोधक जसे आपल्या आजूबाजूला आहेत. तसे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काही मंडळी दिवसरात्र काम करतात. त्यांना पर्यावरणवादी कार्यकर्ते असे म्हणतात. या कार्यकत्यांमधील एक चर्चेतलं नाव म्हणजे ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg.

टीम निसर्गरंग

info@nisargaranga.com

ग्रेटा ही एक लहान मुलगी, पण तिने घेतलेले निर्णय आणि स्पष्ट मतांमुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली. गेल्या काही वर्षांत वाढत असलेलं पृथ्वीचं तापमान, त्यातून निर्माण झालेले हवामान बदलांचे दुष्परिणाम दुष्परिणाम टाळण्यासाठी सगळ्या जगाने एकत्र आले पाहिजे, असं ग्रेटा सगळ्यांना सांगते. ग्रेटाने जगभरात शाळकरी मुले आणि तरुणांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय संस्था तिला त्यांच्या महत्वाच्या बोलावतात. बैठकांमध्ये आवर्जुन

डिसेंबर २०१८मध्ये पोलंडच्या कॅटोविस शहरातील जागतिक हवामान परिषदेला संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीररीत्या फटकारले. हवामान बदल समजून सांगण्याएवढे तुम्ही प्रगल्भ नाही. तुम्ही आम्हा बालकांवर अवाढव्य ओझे लादले आहे. लोकप्रिय होण्यासाठी धडपडण्याची मला आस नाही. मला आपली सजीव पृथ्वी आणि हवामान यांची काळजी आहे, या शब्दांत तिने उपस्थितांना खावले.

ग्रेटा थनबर्ग ही मूळची स्वीडनची… तिला लहानपणी निसर्गाचे आकर्षण वाटत होते. आठ वर्षांची म्हणजे तिसरी इयत्तेत शिकत असताना शाळेत तिने हवामान बदल या विषयावरची एक डॉक्युमेंट्री बघितली. हवामान बदलांमुळे भविष्यात निसर्गामध्ये किती गंभीर बदल घडणार आहेत, ही माहिती डॉक्युमेंट्रीतून तिला कळाली आणि ती दुःखी झाली. तिने याबद्दल अधिक माहिती शोधायला सुरुवात केली. प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे भविष्यातील तरुणांचे आरोग्य धोक्यात येणार आहे, या विचाराने तिला निराश वाटायला लागले. तिने हळूहळू सगळ्यांशी बोलणं बंद केलं. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे, असं तिला सारखं वाटत होतं. खूप विचार केल्यावर या कामाची सुरुवात आपल्या घरातूनच करायची, असं तिनं ठरवलं. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तिने वडील स्वान्त आणि आई मलेना यांना शाकाहारी होणे कसे गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यांनीही ते मान्य केले.

Greta Thunberg
Image Courtesy: https://twitter.com/GretaThunberg
Greta Thunberg

विमानांच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन तिने दोघांना विमानप्रवास बंद करायला लावला. एवढीशी चिमुरडी पण खूप मनापासून काही करत आहे, म्हणून पालकांनीही तिला प्रोत्साहन दिलं. याच काळात सभोवताली पर्यावरणाचा हास करणाऱ्या अनेक घटना घडत होत्या. त्यामुळे ग्रेटा अस्वस्थ झाली. शेवटी एक दिवस २०१८मध्ये तिने शाळेत सुट्टी घेतली आणि स्वीडनची संसदीय इमारत गाठली. पर्यावरणाला वाचविण्याचा संदेश देणारा फलक घेऊन ती कार्यालयाच्या बाहेर दिवसभर बसली. जाणारे-येणारे लोक तिला बघत होते, पण मदतीला कोणी पुढे आले नाही. संसदेतील अधिकारीही फिरकले नाहीत. तिचे मित्रमैत्रीणही आले नाहीत. पण, ग्रेटा निराश झाली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती इमारतीच्या कडेला फुटपाथवर बसली. आता मात्र लोक जमा व्हायला लागले. सगळेच जण हवामान बदलाचे संकट अनुभवत होते, पण कृती करण्यासाठी ते धजावत नव्हते. निदान स्वीडनने तरी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ती प्रत्येकाला सांगत होती. तिच्या आंदोलनाची दखल घेऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने देण्यास बोलविण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावरून तिच्या भावना, निरागस बोलगं पर्यावरणाविषयी वाटणारी कळकळ सर्वदूर पसरली. बघता बघता जगभरातील तरुणांनी तिला पाठिंबा दिला. ठिकठिकाणी आंदोलने केली.

जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक, पर्यावरणासाठी काम करणाया संस्थांनी तिला मदत करायला सुरुवात केली. तिने सुरू केलेले फ्रायडेज फॉर फ्युचर हे आंदोलन जगभर पसरले असून, शंभरहून अधिक देशात हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदवला. ग्रेटाला आदर्श ठेवून अनेक तरुण मंडळी आता पर्यावरणासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहेत. ग्रेटाने आतापर्यंत संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत. ग्रेटा विमान प्रवास करीत नाही. त्यामुळे न्यूयॉर्क आणि माद्रिदमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक परिषदेमध्ये तो आणि तिचे वडील जहाजाने गेले होते. हवामान बदलांमुळे होणारे नुकसान पाहता आता चर्चा नाही, कृती करण्याची वेळ आली आहे. जगाने एकत्र येऊन पृथ्वीला वाचविण्यासाठी काम करायला हवे. पूर्वी लोकांनी खूप प्रदूषण केले, त्यामुळे आता नैसर्गिक संकटे वाढली आहेत. आमचा यात काही दोष नाही, तरी देखील आम्ही मुलं मोठी होऊ तेव्हा, आम्हाला जास्त नुकसान सोसावे लागणार आहे.

भविष्यातील संकटाला रोखण्यासाठी आतापासून प्रयत्न करावे लागणार आहेत, असे ग्रेटा सगळ्यांना सांगते. तिच्या कार्याची दखल घेऊन जगातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठीही तिची शिफारस करण्यात आली होती.

आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!