निसर्गाबद्दल आकर्षण असलेली अनेक भन्नाट माणसं आपल्या राज्यात, देशात आणि विविध देशात मोलाचं काम करत आहेत. काहींनी पक्ष्यांवर अभ्यास केलाय, काहींनी वन्यप्राणी, वनस्पती तर काही ताई-दादांनी बुरशीवरही संशोधन केलंय. या अवलियांमुळेच आपल्याला निसर्गातील रहस्यांचं कोडं उलगडत आहे. अशा या वेगळ्याच क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींची माहिती या सदरात मिळणार आहे.
टीम निसर्गरंग
प्रत्येकाच्या हातात मोबाइलमुळे कॅमेरा आल्याने पक्ष्यांचे फोटो काढणारे आपल्या भोवती अनेकजण असतात. पण पक्ष्यांचा आवाज काढणारी आणि त्यांच्या आवाजाला पक्ष्यांचाही प्रतिसाद मिळत असेल, अशी माणसं मोजकीच दिसतील. त्यांच्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे किरण पुरंदरे Kiran Purandare… ते एक नामवंत पक्षी अभ्यासक आहेत. किरण पुरंदरे यांना किरण काका नव्हे तर किका म्हणतात. या काकाने निसर्ग संवर्धनासाठी केलेलं काम महत्वपूर्ण आहे. जंगलाविषयी अपारप्रेम, तिथल्या मातीशी एकरूप झालेला, उत्साही, सतत नाविन्याच्या शोधात असलेला हा किका हा पक्षिविश्वाचं चालतं बोलतं गाइड आहे.
किका लहानपणी कल्याणमध्ये राहायला होता. लहानपणी मित्रांबरोबर तो चतुर पकडायचा. हे चतुर अभ्यासासाठी नाही तर खेळण्यासाठी पकडले जात होते. त्याचे काही मित्र नाना प्रकारचे पक्षी भाजून खात होते. त्यावेळी किकाला आपण काही तरी चुकीच करतोय याची जाणीवच नव्हती. पुढे पालकांबरोबर तो पुण्यात राहायला आला तेव्हाही नदीत पोहायला जाणे, भरपूर भटकण चालू होते. पण भटकंतीचे रुपांतर हळूहळू कुतूहलात निर्माण होण्यास सुरूवात झाली. आणि त्याने निसर्ग निरीक्षणास सुरुवात केली. सभोवताली दिसणारी झाडं, फुलं, फुलपाखरे, पक्षी, झरे, ढग, डोंगर त्यांच्या नकळत अभ्यास सुरू झाला. एक दिवस त्याला सहज वाटले, सुभग पक्ष्याला साद घालावी. सहज शिट्टी जमली, गंमत म्हणजे सुभग पक्ष्यानेही त्याला प्रतिसाद दिला. पुढे पक्ष्यांचा आवाज काढण्याचा किरणचा छंद झाला. हळूहळू त्याने शंभरपेक्षा जास्त पक्ष्यांच्या हुबेहुब नकला करायला सुरूवात केली.
वेगवेगळ्या निसर्ग अभ्यासकांची पुस्तके त्याने वाचयाला सुरुवात केली. निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमामुळे काही पुस्तकातील उतारे तोंडपाठ झाले. पक्ष्यांची नावे त्याने मराठीतून शोधली आणि पुढे महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांची मराठीतील, स्थानिक नावांची पहिली यादी तयारी केली. अनेक पक्षी अभ्यासक ही यादी गाइड म्हणून वापरतात
पुढे निसर्ग वाचनासाठी त्याने अनेक जंगले पालथी घातली. दिवसरात्र जंगलात मचाणात बसून प्राणी, पक्ष्यांची निरीक्षणे टिपायला सुरूवात केली. त्यावर लेखन सुरू केले. शाळा, कॉलेजमध्ये जाऊन त्याने सचित्र व्याख्याने दिली. हजारो मुलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे किरणच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांनी निसर्ग भ्रमंती हे करिअर म्हणून निवडलं. पुढे २००१मध्ये त्यानं नवीन आव्हान स्वीकारलं. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा Nagzira अभयारण्यात तो चारशे दिवस राहिला.
या काळात त्याने पंधराशे किलोमीटर पायी प्रवास, बाराशे किलोमीटर सायकल चालवली. वन्यप्राण्यांच्या निरीक्षणासाठी एकदा तो एका जागी अठ्ठेचाळीस तास बसला. या वर्षात अवघे ४ ते तब्बल ४६ अंश सेल्सिअस अशा प्रतिकूल तापमानात अन् पावसाळ्यात त्याने जंगलात वास्तव्य करुन निसर्गाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला. या काळात आलेल्या अनुभवांवर त्याने सखा नागझिरा हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वाचताना आपण जंगलात बसून प्रत्यक्ष वन्यप्राण्यांचा अनुभव घेतो आहोत, असे चित्र डोळ्यासमोर तयार होते.
किरणला सत्तरहून अधिक पक्ष्यांची शीळ आणि वन्यप्राण्यांचे हुबेहुब आवाज काढता येतात. जंगलात त्याच्याबरोबर वॉकला गेल्यावर, किरणने शीळ घातल्यावर पक्ष्यांकडूनही त्याला प्रतिसाद येत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. रानगुंफी या कार्यक्रमातून किका सभागृहात अभ्यासक ही यादी गाइड म्हणून वापरतात. बसून अभयारण्याची सफर घडवून आणतो. नागझिरा अभयारण्याच्या सीमेवरचे पिटेझरी या गावामध्ये किकाचे गेल्या पंधरा वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे काम सुरु आहे. तिथल्या लोकांबरोबर राहून तो निसर्ग संवर्धनाचं काम करतो आहे. या गावातील लोक, तिथलं मुल त्याच्या या कामात सहभागी झाली आहेत. याच वर्षी त्याने पुणं सोडून कायमस्वरुपी पिटेझरी गावात राहण्याचा निर्णय घेतलाय. या गावात त्याने छोटं घर बांधलय. गावकऱयांबरोर झपाटल्यासारखं काम करतो आहे.
आपल्याला परिचयाचे असे कोणी अवलिया निसर्गमित्र असतील तर आम्हाला नक्की कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com