140 Types of Butterflies found in Matheran
माथेरानमध्ये आढळली १४० प्रकारची फुलपाखरे

महाबळेश्वर एवढेच लोकप्रिय ठरलेले माथेरानही निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. तिथे झाडांमध्येही खूप विविधता असल्यामुळे तिथे राहणारे पक्षी आणि फुलपाखरांमध्येही खूप विविधता आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेचे संशोधक गेल्या नऊ वर्षांपासून माथेरानमध्ये फुलपाखरांचा अभ्यास करत होते. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल त्यांनी आता लोकांसमोर मांडला आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी एक दोन नव्हे…. तब्बल १४० प्रकारची फुलपाखरे आढळत असल्याचे त्यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

माथेरानमध्ये ब्रिटिश संशोधक जे. ए. बेथम यांनी १२५ वर्षांपूर्वी फुलपाखरांची यादी तयार केली होती. त्या वेळी त्यांना फक्त ७८ प्रकारची फुलपाखरे दिसली होती. त्यानंतर फुलपाखरांची यादी अद्ययावत करण्याचे काम झाले नव्हते. आता बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतील संशोधक मंदार सावंत, डॉ. निखिल मोडक आणि सोमय्या विद्या विहार विद्यापीठाचे सागर सारंग यांनी सलग नऊ वर्षे अभ्यास करून ही यादी तयार केली आहे. त्यांना फुलपाखरांच्या १४० प्रजाती आढळून आल्या आहेत. यातील पंधरा प्रकारची फुलपाखरे दुर्मीळ वर्गात मोडतात. तसेच डबल बँडेड क्रो (double banded crow) हे फुलपाखरू पहिल्यांदाच आढळून आले आहे. हा अभ्यास करताना त्यांनी फुलपाखरांच्या एकूण २२ हजार ८३३ नोंदी घेतल्या होत्या.

माथेरानचं वैशिष्ट्य म्हणजे ते लोकप्रिय पर्यटन स्थळ असले, तरी तिथे आजही पर्यटकांच्या वाहनांना बंदी आहे. लोक ट्रेनने माथेरानला जातात. तिथे फिरायचे असेल, तर चालत किंवा घोड्यांवर हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच माथेरानचे हवा प्रदूषण अजूनही नियंत्रणात राहिले आहे. संशोधक फुलपाखरांची माहिती घेत असताना, माथेरानमधील वाढते पर्यटन आणि निसर्गात फेकला जाणारा कचरा फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण करत असल्याचे त्यांना आढळले.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!