पावसाळा सुरू होताच वर्तमानपत्रांमध्ये जसे खळाळणाऱ्या धबधब्यांचे फोटो प्रसिद्ध होतात, तसेच फोटो भातलावणीच्या खाचरांचेही प्रसिद्ध होतात. जून ऑगस्टपर्यंत सतत कुठे ना कुठे ते भातलावणीबद्दल माहिती आपल्या कानावर येते. गंमत म्हणजे काही शाळा अलीकडे मुलांना भातलावणीसाठी Rice Plantation एखाद्या शेतात घेऊन जातात. कोकणात तर भातलावणीच्या स्पर्धाही सुरू झाल्या आहेत.
ओंकार देशपांडे
मित्रांनो, खरंच भातलावणीचा अनुभव एकदा तरी तुम्ही घेतला पाहिजे. भात आपल्याआठी खूप महत्वाचा आहे. भाताशिवाय आपले रोजचे जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे आजच्या या लेखात आपण भातलावणी म्हणजे काय आणि ती कशी करतात हे पाहणार आहोत.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये भात लावणी पारंपरिक पद्धतीने करतात. यामध्ये अनेक टप्पे असतात. भाताच्या शेतीची सुरुवात अर्थातच पेरणीपासून होते. साळीचा भात हा बियाणे म्हणून शेताच्या उंच भागावर लावला जातो. मान्सून सुरू होण्यापूर्वी जो पाऊस पडतो, त्याला काही जण वळवाचा तर काही मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. या पावसाने जमीन ओलसर होते. या ओलीवरच भाताचे पहिले रोप तयार करण्याची पद्धत आहे. साधारणतः महिनाभरात ही रोपे मोठी होतात. या मोठ्या झालेल्या रोपांना शेतकरी दाढ असं म्हणतात.
दाढ खणणे
भाताची दाढ साधारणपणे ८ ते १२ इंचापर्यंत वाढली की खणण्याची प्रक्रिया सुरू होते. शेतकरी ही सर्व रोपं चक्क उपटतो. या रोपांचे छोटे छोटे गठ्ठे केले जातात. गठ्ठयांना मूठ म्हणतात. हे काम सुरू असताना पाऊसही सुरू होतो. डोंगरांवरून उताराकडे वाहत येणारे पाणी शेतात गुडघाभर उंचीइतके साठल्यानंतर भातलागवड सुरू होते. साधारणपणे जुलै महिन्यात रोपांच्या पुनर्लागवडीला सुरुवात होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (दापोली) चारसूत्री भातलावणीची पद्धत विकसित केली आहे. डॉ. सावंत हे भारतातले या संशोधनाचे जनक मानले जातात.
भाताची पुनर्लागवड
भातलावणीचा हा टप्पा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. शहरातील फोटोग्राफर भातलावणीची दृश्ये टिपण्यालाठी आवर्जून ग्रामीण भागात धाव घेतात. पोटापाण्यासाठी शहरात आलेली मंडळी सुट्टी काढून भातलावणीसाठी गावाकडे परततात. भाताच्या पुनर्लागवडीची प्रक्रिया सलग पूर्ण करावी लागते. दिवसभर पाण्यात उभे राहून ही रोपे पुन्हा जमिनीत खोचायची असतात. या वेळी कुटुंबातील सगळे, बाहेरून बोलावलेले मजूर, खास भातलावणी अनुभवण्यासाठी आलेली माणसे एकत्र काम करताना पारंपरिक गाणी म्हणतात. हसतखेळत हे काम सुरू असते. लांबवरून धबधब्यांचा आवाज येतो, कुठे पाटाचे पाणी खळाळत असते. त्यावर ठेका धरून गाणी रंगत जातात. भात लावणी करण्याचेही शास्त्र आहे. सर्व रोपे एकाच रांगेत, ठरावीक अंतरावर लावण्याचे एक तंत्र आहे.
झोडणी अन् उफणणी
साधारपणे तीन महिन्यांनी भाताची पिकं मोठी होतात. पूर्वी बैलांना फिरवून भाताच्या पिकांची मळणी केली जायची. उफणणी म्हणजे वाऱ्याच्या दिशेने उभे राहून सुपाने तांदूळ चाळणे होय. पूर्वी उखळीमध्ये साळ भरडली जात असे. या भाताला हातसडीचा तांदूळ म्हणतात. यामध्ये यांत्रिक प्रक्रिया कुठेही नाही. हल्ली मोजक्याच ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये खूप वेळ जातो आणि मनुष्यबळही लागते. त्यामुळे बहुतांश शेतकरी राइस मिलमध्ये जाऊन भाताचा कोंडा काढून घेतात. जूनमध्ये सुरू झालेली तांदळाची निर्मिती प्रक्रिया साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान संपते. पुढे हा भात मुरवला जातो आणि मग त्याची विक्री होऊन वेगवेगळ्या विक्रेत्यांमार्फत तो तुमच्या घरात येतो. भाताशिवाय आपले जेवण पूर्ण होऊ शकत नाही. हा भात ताटात येण्यामागे शेतकऱ्याची खूप मेहनत असते. आपण त्याची जाणीव सदैव ठेवली पाहिजे.
भात निर्मिती प्रक्रियेत निसर्ग अनेकदा शेतकऱ्याची परीक्षा घेतो. कधी पाऊस ओढ देतो, तर कधी थंडीतही हजेरी लावतो. कधी तरी आपणही भातलावणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन हा अनुभव घेतला पाहिजे.
भारतात भाताच्या सहा हजार जाती
आपल्याला बासमती तुकडा, आंबेमोहोर, इंद्रायणी असे भाताचे मोजकेच प्रकार माहिती आहेत. प्रत्यक्षात आपल्या देशात भाताच्या सहा हजार प्रकारच्या जाती आढळतात. फिलिपिन्स या देशात आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे. तेथील संशोधकांनी जगभरातील भाताच्या ३० हजार जातींचे जतन केले आहे. आपण मोजक्या जातींचा भात खात असल्याने इतर जाती आपल्याला माहितीच नसतात. यातील अनेक जातींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेतकरीही हल्ली भाताच्या ठरावीक जातींची लावणी करतात. महाराष्ट्रात भात लागवड वर्षातून एकदाच होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पाऊस जास्त असल्याने भाताचे पीक दोन वेळा घेतात.
भरल्या आभाळाचा, रिमझिम पावसाचा
शेतकऱ्याच्या कष्टाचा काळ भातलावणीचा…
मायाळू लाल माती, पावसाने सुखावते
जणू आईच्या मायेने, तान्ह बियाणं जपते…
रोपे वाढीस लागती वाऱ्यासंगे ती डोलती
त्यांच्या कांतीची झळाळी जणू पाचू ओशाळती….
साद येई नव्या मातीची, स्वप्ने आभाळी जाण्याची ,
जणू ठाऊक साऱ्यांना, आली वेळ निशेपाची…
होई शिंपण कष्टाची, अन् कृपा देवाजीची
वेळ सुगीच्या सुखाची, जणू दृष्ट काढण्याची….
असे नाळ जुळलेली बाईसंगे या भाताची
बिया माहेरी रुजती, रोपे सासरी नांदती….
नाते दोघांचे जपण्या, रीत ओटी भरण्याची
म्हणून बाईच्या कुशीत, आहे ओटी तांदळाची….
– मानसी भिडे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com