देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य Aralam Wildlife Sanctuary
भारतात वाघासाठी राखीव अभयारण्य आहेत. सिंहांसाठी संरक्षित केलेलं गीरचं जंगल आहे, कर्नाटक-तमिळनाडूमध्ये हत्तींसाठी राखीव जंगल आहेत, पण तुम्ही कधी फुलपाखरांसाठीही राखीव जंगल असू शकतं याचा विचार केलाय का.. केरळमधील राज्य वन्यजीव मंडळाने हा विचार करूनच कन्नूर जिल्ह्यातील अरालम वन्यजीव अभयारण्यला Aralam Wildlife Sanctuary फुलपाखरू अभयारण्य जाहीर केलं आहे.
निसर्ग साखळीतील फुलपाखरांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अरालम हे जंगल आता देशातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य ठरलं आहे.

केरळ राज्य वन्यजीव मंडळाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय़ घेण्त आला. या जंगलामध्ये फुलपाखरांची संख्या प्रचंड असून त्यात विविधताही मोठी आहे. हिवाळ्यात स्थलांतर करणाऱया पक्ष्यांप्रमाणे या जंगलातही दरवर्षी शेकडो फुलपाखरं स्थलांतरासाठी येतात. काही फुलपाखरं त्यांच्या स्थलांतराच्या प्रवासात विसावा म्हणून या जंगलात थांबतात. यातील फिकट पिवळ्या रंगाचं कॉमन अल्बॅट्रॉस फुलपाखरू सगळ्यांच आकर्षण ठरतात. ही फुलपाखरं उंच टेकड्यांवरून स्थलांतर करून या जंगलात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या जंगलात बघायला मिळतात. जंगलातील चिनकन्नी नदीच्या काठावर, जवळचे ओढे, झऱ्यांच्या शेजारील ओलसर भागात ती शेकडोंच्या संख्यने बघायला मिळतात.
हेही वाचा: साडे चारशे किलो मोरपिसांची तस्करी उघड

मलबार नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (एमएनएचएस) पुढाकाराने वीस वर्षांपूर्वी फुलपाखरू अभ्यासकांनी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. वर्षभर विविध हंगामामध्ये हा उपक्रम राबवून फुलपाखरांच्या प्रकारांच्या नोंदी, ती कोणत्या झाडांवर बसतात, कोणत्या भागात राहतात याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी फुलपाखरांची विविधता पाहून अभ्यासक थक्क झाले होते. कौतुकाची बाब म्हणजे या साधारण ५५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या अभयारण्यामध्ये २६६ पेक्षा जास्त प्रकारची फुलपाखरे आढळतात. यातील काही फुलपाखरं अत्यंत दुर्मिळ आहेत, तर काही फुलपाखरं आता संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. काही प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. केरळमधील फुलपाखरांचा समृद्ध अधिवास म्हणून हे जंगल गेल्या काही वर्षात लोकप्रिय झालं आहे. याचीच दखल घेऊन राज्य वन्यजीव मंडळाने अरालम या वन्यजीव अभयारण्याला आता फुलपाखरू अभयारण्य अशी नवीन ओळख दिली आहे. फुलपाखरू अभ्यासक, फुलपाखरू प्रेमींसाठीही आनंदाची बातमी ठरली आहे.
header image: Vengolis, Wikimedia Commons.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.