कार्बन न्यूट्रल पाटोदा गावाचं पंतप्रधानांनी केलंय कौतूक Ideal Village Patoda
ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक हवामान बदल थांबविण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी कसे करता येईल, यावर जगभरात बैठकांची सत्र सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा या छोट्याशा ग्रामपंचायतीने कार्बन न्यूट्रल गाव अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या गावाच्या यशस्वी म़ॉडेलचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये कौतुक केलं. त्यामुळे हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जाणून घेऊ या अनोख्या गावाचा प्रवास.. Ideal Village Patoda
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर या तालुक्यातील पाटोदा हे छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या आहे सुमारे साडे तीन हजार. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ग्रामविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या एका योजनेसाठी देशभरातील अकरा गावांची निवड केली होती. त्यामध्ये पाटोदा गावाचा समावेश करण्यात आला आणि गावाने संधीचे सोने केले. निसर्गातील संसाधनांचा, प्रदूषणाला जबाबदार घटकांचा कमीत कमी वापर आणि टाकाऊतून टिकाऊ या मुद्द्यांवर गावाने भर दिला आहे. वृक्ष संवर्धन, वृक्षांची संख्या वाढविण्याच्या उद्देशामुळे गावात उत्सर्जन होणारा कार्बन शोषून घेणारी नैसर्गिक बँकही वाढते आहे. शाश्वत जीवनशैली स्वीकारल्याने या गावाचं कौतुक होतं आहे
हेही वाचा: कचरा द्या अन् बक्षीस घेऊन जा
गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्युरिफिकेशन प्लँट बसविण्यात आला असून प्रत्येक घराला पाण्याचं एटीएम कार्ड देण्यात आले आहे. लोक एटीएमचा वाप करून गरजेएवढे पाणी विकत घेतात. त्यामुळे पाणी जास्त मिळाले, कमी मिळाले हे वाद आता तिथे होतच नाही. पैसे भरा आणि हवे तेवढे पाणी घेऊन जा सर्वांना समान नियम आहे. गंमत म्हणजे पाण्याचेही चार प्रकार आहेत. एक पिण्याचे पाणी, दुसरे वापराचे, तिसरे साधे आणि चौथे गरम पाणी. वापराचे व साधे पाणी दोन वेगवेगळ्या नळांद्वारे चोवीस तास उपलब्ध असते. सांडपाण्यावर प्रक्रिया देखील करण्यात येते. पाण्याच्या शुद्धिकरणासाठई दगड, विटा, वाळू, माती अशा नैसर्गिक घटकांचे फिल्टर बनविण्यात आले आहेत. प्रक्रिया करून स्वच्छ झालेले पाणी पुढे शेतीसाठी वापरतात, उर्वरित पाणी नदीत सोडले जाते.
कोणत्याही घरातील गावकरी स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था आहे. ओला कचरा अनेकांच्या परसबागेतच जिरवला जातो. किंवा गावाच्या कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पामध्ये जमा केला जातो. तेथून गावात कोणाचा मृत्यू झाल्यास लाकडांऐवजी शेण्या वापरून अंत्यसंस्कार केले जातात आणि त्याची राख वापरून दिवंगत व्यक्तीच्या नावे झाड लावले जाते. या गावातली स्वच्छता देखील बघण्यासारखी आहे. छोट्या छोट्या सवयीतून गावांने एकी दाखवत मोठे परिवर्तन घडवून आणले आहे.
हेही वाचा: पद्मश्री चैत्राम पवार
पाटोदा गावामध्ये गेल्या काही वर्षात सौर उर्जेचेही जाळे पसरले आहे. रस्त्यांवर सौरदिवे तर घरांमध्ये गावकरी सौर कंदिल वापरतात. गावकऱयांना पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत पुरवलं जाणारं गरम पणी देखील सौर उर्जेवर तापवतात. गावकऱयांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी ग्रामपंचायतीने मोठ्या चौकांमध्ये ध्वनिक्षेप बसवले आहेत. त्यावरूनच सुचना सांगितल्या जातात.
वृक्षारोपणातही हे गाव मागे नाही. विविध सण समारंभांच्या
निमित्ताने गावात वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असतात. शाळेत प्रत्येक मुलाच्या वाढदिवासाला पाच रोपं लावण्याची नियम त्यांनी केला आहे. गंमत म्हणजे तेथील लोकसंख्येच्या दुपटीने या गावात फळझाडे आहेत. लग्न समारंभांमधील अनेक अपव्यय टाळण्यासाठी सामुदायिक विवाह केले जातात. महिलांच्या कौशल्याला चालना देण्यासाठीही वर्षभर विविध योजना राबविल्या जातात.
सार्वजनिक स्वच्छतेसाठीही गाव आग्रही आहे. ग्रामपंचायतीने मुख्य चौकांमध्ये मोठी हात-पाय धुण्याची केंद्र उभारली आहेत. लोक नियमित त्यांचा वापर करतात. या गावात सार्वजनिक धोबी घाटही बादण्यात आले आहेत. यामुळेही सगळ्या महिला एकत्र येऊन संवाद साधतात, एकत्रित धुणी धुण्यामुळे पाण्याची बचतही होते.
पाटोदा ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांचं शासकीय दरबारात कौतुकही झालं आहे. गावाच्या कामाची दखल घेऊन विविध पुरस्कारही देण्यात आले आहेत. आता इतर गावांमधील लोक या गावातील कामांच अनुकरण करत आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.