काय सांगता ? अपानवायू सोडण्यावर (पादण्यावर) आणि ढेकर देण्यावर आता लागणार कर?? Denmark Cow Fart Tax
दूध आणि दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या डेन्मार्कमध्ये नुकताच एक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला आहे. डेन्मार्कमध्ये माणसांच्या संख्येपेक्षा पाचपट जास्त डुक्कर आणि गायींची संख्या आहे. तेथील सुमारे दोन तृतीयांश जमीन शेतीखाली आहे. पण तेथील शेती आणि दुधाचा व्यवसाय आता हरितगृह वायू उत्सर्जनास मोठा वाटा ठरला आहे. हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींवर नागरिकांकडून, पर्यावरणवादी संस्था आणि अभ्यासकांकडून दबाब येतो आहे. त्यामुळे आता डेन्मार्कच्या राजकीय वर्तुळातील तीन पक्षांनी बनलेल्या आघाडी सरकारने एक भन्नाट निर्णय घेतला आहे.
दुधव्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या पशूधनाच्या विष्ठेतून, ते अपानवायू सोडल्यावर आणि ढेकरावाटे बाहेर वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायू उत्सर्जनावर कर लावण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हवेत मिसळलेल्या जाणाऱ्या घातक, आणि तापमानवाढीस जबाबदार मिथेन वायूचे सर्वाधिक उत्सर्जन या प्राण्यांमुळे होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
गेल्या काही वर्षांपासून या विषयावर चर्चा सुरू होती. सगळ्यांची मान्यता मिळाल्याने अखेर डॅनिश संसदेने या नव्या निर्णयाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पशुधनावरील हा जगातील एकमेव हवामान कर ठरला आहे. ह्या करातून मिळणाऱ्या रकमेचा देशातील कृषी क्षेत्रातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि विष्ठा साठविण्याच्या गोदामांमुळे नापीक झालेल्या शेतजमिनींना पुनरुज्जीवन देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
हेही वाचा: जीवाश्म इंधनांच्या उच्चाटनासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक नवकल्पना निर्माण झाल्या पाहिजेत
डेन्मार्कचा सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक कृषी महासत्तांसाठी, अमेरिकेसह राजकीयदृष्ट्या बलाढ्य कृषी लॉबीला विचार करण्यास परावृत्त करणार आहे. तापमान वाढीस जबाबदार असलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये जागतिक स्तरावर अन्न-उद्योग क्षेत्राताचा एक चतुर्थांश वाटा आहे. ते उत्सर्जन कमी करण्यासाठी आहार, नोकऱ्या आणि उद्योगांवर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. हवामान बदलांमुळे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक समस्या वाढल्यामुळे शेतकऱ्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच हरित उत्सर्जन रोखण्यावर शाश्वत पर्याय स्वीकारण्यासाठीही शेतकऱ्याला भविष्यात अनेक क्रांतीकारक निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे डेन्मार्क येथील अभ्यासकांचे मत आहे.
ब्रुसेल्सपासून दिल्लीपर्यंत आणि वेलिंग्टनपर्यंत शेतीतून होणारे मिथेन आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध झाला आहे. औद्योगिक क्षेत्र, शहरीकरणामुळे होत असलेल्या प्रदूषणाच्या तुलनेत शेती क्षेत्रातून निर्माण होणारे हरित वायू उत्सर्जन कमी असल्याचा त्यांचा दावा आहे. पण अनेक देशांनी त्यांच्या कृषी प्रक्रियेत बदल करायला सुरुवात केली आहे.
गंमत म्हणजे, न्यूझीलंड सरकारने दोन वर्षांपूर्वी ढेकर कर म्हणजेच बर्प टॅक्सचा Burp Tax प्रस्ताव ठेवला होता. डेन्मार्कच्या या निर्णयालाही तीव्र राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागले. तज्ज्ञांच्या स्वतंत्र पॅनेलने उच्च करासह अनेक मार्ग सुचवले होते. शेतकरी लॉबीने याला कडाडून विरोध केला होता. कर शून्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ आणि सबसिडी देणारी योजना सरकारने आखली तेव्हा पर्यावरणप्रेमींनी त्यास आक्षेप घेतले. हा कर खूपच ढिसाळ असल्याचे म्हटले. ऑक्टोबरमध्ये शेवटची चर्चा, अनेक वाद, विचारमंथन सुरू असताना सरकारी कार्यालयासमोर ‘Food for People, not Feed for Animal’, अशा आशयाचे निषेधाचे फलक झळकले. अखेर गेल्या आठवड्यात कर घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डेन्मार्क सरकारने २०३० पासून शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वर कर लागू केला आहे. यासाठी प्रति एक टन कार्बन डायऑक्साईडसाठी तीनशे डॅनिश क्रोनर (सुमारे ४३ अमेरिकन डॉलर) आकारण्यात येणार आहेत. २०३५ पर्यंत हा कर दुपटीने वाढून ७५० क्रोनर होईल.
सरकारचे कृषी मंत्री जेप ब्रुस यांनी निर्णयावर भाष्य केले. ते म्हणाले, पोट फुगणे पूर्णपणे दूर करण्याचे तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध नाही. शेतकऱ्यांनी गायीच्या विष्ठेतून बाहेर पडणारा मिथेन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकराचा चारयाचा वापर करावा. डुकरांची विल्हेवाट लावतानाही अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि शाश्वत पर्याय वापरण्याची गरज आहे. प्रदूषणावरील कर थांबवायाचा असेल तर व्यावसायिकांना त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावे लागणार आहेत, असे ब्रुस यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच डेन्मार्कने घेतलेला निर्णय अनेकांना विचार करायला लावणार आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.