Air Quality Index AQI हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे काय
हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे काय Air Quality Index AQI

हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे काय Air Quality Index AQI

अझरबैजान येथील बाकू शहरामध्ये सध्या, संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली जागतिक हवामान बदल परिषद सुरू आहे. जगभरातील तापमान वाढ, नैसर्गिक आपत्तींची वाढलेली संख्या, हवा प्रदूषणामुळे वातावरणात वाढलेली उष्णता आणि या सगळ्याचा माणसाच्या आरोग्यावर, जीवसृष्टी आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांवर विचारमंथन सुरू आहे. आणि दुसरीकडे दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत हवेची गुणवत्ता Air Quality Index AQI ढासळल्याच्या बातम्या येत आहेत.

हवा खराब झाल्याने दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील शाळांना सुट्टी द्यावी लागली. श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी मास्क लावल्याशिवाय घऱाबाहेर पडणे टाळावे, अशा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्येही वायू प्रदूषण वाढले आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिकसह चंद्रपूरमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. दरवर्षी हिवाळा सुरू झाला की हवेची गुणवत्ता का खराब होते, एरवी हवेचे प्रदूषण होत नाही का, हा प्रश्न अनेकांना पडतो.

याचे उत्तर म्हणजे, वाढत्या शहरीकरणामुळे आज सर्वच विकसित शहरांमध्ये वर्षभर प्रदूषित वायूंचे उत्सर्जन होत असते. वाहतूक हा शहरातील वायू प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहे. त्या पाठोपाठ वेशीवरील औद्योगिक कारखाने, उघड्यावर जाळला जाणारा सर्व प्रकारचा कचरा आणि शेतात मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी जाळला जाणारा पाचोळा.. पावसाळ्यामध्ये सर्व प्रदूषके, धुलीकण पाण्याबरोबर वाहून जातात, त्यामुळे हवा स्वच्छ असते. उन्हाळ्यात हवा हलकी असल्याने प्रदूषित हवा वातावरणाबरोबर उंच वर जाते. पण हिवाळ्यात हवा जड असते. तापमानाचा पारा जसा खाली जाईल तसे प्रदूषण वाढते. कारण वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्सर्जित होणारे घातक वायू, धुलीकण वातावरणात खालच्या स्तरावर राहतात. जर तुम्ही रात्री, रस्त्यावर दिव्याच्या प्रकाशाखाली पाहिले तर धुरकट वातावरण दिसते. ते धुके आणि धूर, प्रदूषकांच्या मिश्रणातून तयार झालेले धुरके असते, ज्याला इंग्रजीत स्मॉग म्हणतात. दिल्लीत दिवसाही स्मॉगचे प्रचंड प्रमाण असल्याने लोकांना समोरचे दिसत नाही, अशी परिस्थिती असते.

हवा प्रदूषण घातक का असते?
आपल्या सभोवतालच्या वातावरणात ऑक्सिजनबरोबरच अनेक वायूंचे मिश्रण असते. यातील घातक वायूंचे हवेतील प्रमाण वाढले की त्यास वायू प्रदूषण म्हटले जाते. जगभरासाठी वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला असून जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेशांमध्ये भारताची राजधानी दिल्लीचा समावेश होतो. तर हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) मोजण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निकष निश्चित केले आहेत. कोणत्या वायूचे, सूक्ष्म, अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण किती वाढले म्हणजे, किती खालावली हे जाहीर केले जाते. यात प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, मिथेन, पार्टीक्यूटेल मॅटर १०, पीएम २,५ या घटकांची दखल घेतली जाते. वाईट, अतिवाईट, धोकादायक श्रेणीमध्ये गेलेला निर्देशांक माणसांबरोबरच प्राण्यांसाठी देखील घातक असतो.

जागतिक हवामान परिषद अझरबैजान बाकू

हवा प्रदूषणातील सर्वाधिक घातक घटक म्हणजे हवेतील सूक्ष्म धुलीकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धुलीकणांचे (२.५) प्रमाण. पीएम २.५ हे नावाप्रमाणेच अतिसूक्ष्म असल्याने श्वसनावाटे थेड फुफ्फुसा पर्यंत पोहोचतात. ते डोळ्यांनाही दिसत नाहीत. हवेतील या धुलीकणांचे प्रमाण वाढले की नागरिकांना सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अलर्जीचे त्रास सुरू होतात. सातत्याने अशा वातावरणात राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. पुणे, मुंबई, नाशिक आणि अर्थातच दिल्लीमध्ये अनेकदा या पीएम २.५ चे प्रमाण हिवाळ्यात धोकादायक पातळी पर्यंत पोहचते. बांधकाम प्रकल्प, रस्त्यावरील धूळ, कचरा जाळल्याने, कारखाने आणि वाहनांतून होणाऱया उत्सर्जनातून धुलीकण तयार होतात.  

याशिवाय औद्योगिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या उत्सर्जनातून, वाहनांमुळे प्रामुख्याने इंधनाच्या ज्वलनाने नायट्रोजन डाय ऑक्साइड ची निर्मिती होते. औद्योगिक कारखान्यांमधून सल्फर डाय ऑक्साइडचीही निर्मिती होते. औद्योगिक प्रक्रिया आणि ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक कारणांमुळेही सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजनची निर्मिती होते. शहरालगत असलेल्या वीटभट्या, खाणकाम आणि काही औद्योगिक प्रकल्पांद्वारे वातावरणात  शिसेही मिसळते. याशिवाय वायू प्रदूषणास जबाबदार महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. सार्वजनिक ठिकाणी जाळला सर्व प्रकारचा कचरा, पालापोचाळा, लाकूड, कोळशाच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइडचे उत्सर्जन होते. या सर्व वायूंमुळे श्वसनाच्या आजारांबरोबरच डोकेदुखी, थकवा, रक्तदाबाशी निगडीत त्रास होऊ शकतात. त्यामुळेच हवेची गुणवत्ता खालावली की डॉक्टर नागरिकांना काळजी घ्यायला सांगतात. करोनानंतर एन९५ मास्कची उपलब्धता वाढल्याने वाहन चालवताना, सार्वजनिक ठिकाणी फिरताना हे मास्क लावा सल्ला डॉक्टर देत आहेत.

तुम्हाला तुमच्या परिसरितील हवेची गुणवत्ता बघायची असेल तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने अलीकडे SAMEER हे मोबईल अप विकसित केले आहे. यावर तुम्हाला तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता बघायाला मिळते. 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!