Ganesh Pooja Patri Ganeshotsav 2024 Ganapati Festival
गणेश पूजापत्री साक्षरता अभियान : गणेशोत्सव २०२४ Ganeshotsav 2024

गणेश पूजापत्री – परंपरा, पर्यावरण, प्रबोधन

गणेशोत्सव, गौरी आगमनासाठी सजलेल्या फुलबाजारांमध्ये गणेशपत्रींच्या नावाखाली वनस्पतींची भेसळ आणि यात दुर्मिळ वनस्पतींची होणारी कत्तल रोखण्यासाठी बायोस्फिअर्स संस्थेच्या वतीने गणेश पुजापत्री Ganesh Pooja Patri साक्षरता अभियान सुरू केले आहे. या महत्त्वाच्या उपक्रमामध्ये लोकसहभाग खूप गरजेचा आहे अशी अपेक्षा बायोस्फिअर्सचे प्रमुख डॉ सचिन पुणेकर यांनी केले आहे. यासाठी ते सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात मोहीम राबावत आहेत.

विविध सण-सनावळ्या, परंपरागत धार्मिक उत्सव (गणेशोत्सव, गौरीपूजन, नवरात्र, हरतालिका, ऋषिपंचमी, दसरा, ईत्यादी) आपल्याकडे अगदी मनोभावे साजरे केले जातात. या सर्व उत्सवांमध्ये वनस्पतींचे महत्व हे अनन्य साधारण आहे. विशेषतः हरतालिका व गणेशोत्सवाच्या काळात रस्तोरस्ती, बाजारपेठा, भाजी-मंडईत, मंदिराबाहेर मोठया प्रमाणात पूजेसाठी वापरली जाणारी पूजापत्री विकली जाते. बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पूजापत्रीचा अभ्यास केला असता या पूजापत्रीत अपवादानेच खरीखुरी पत्री पहावयास मिळते. पत्रीच्या नावाखाली अगदी वाटेल त्या वनस्पतींची भेसळ केली जाते किंवा असते. पत्रीत समावेश नसलेल्या काही दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ व औषधी वनस्पतीही निसर्गातून मोठया प्रमाणात ओरबाडल्या जातात.

आपल्याकडील धर्म-साहित्यामध्ये, पूजा-विषयक साहित्यामध्ये पूजापत्री बाबत आपण नेहमीच वाचत असतो किंवा त्याबाबत ऐकत असतो. विविध देव-देवतांनुसार पूजापत्रीमध्ये बदल बघावयास मिळतो. वास्तविक पूजापत्री मधील नमूद वनस्पती ह्या औषधी गुणयुक्त असतात. पावसाळ्यात विविध साथींचे आजार, हवेतील रोगकारक जंतूंचा प्रादुर्भाव, सर्दी-पडसे, सांधेदुखी असे अनेक आजार डोके वर काढू लागतात. पत्रीमधील वनस्पतीमध्ये या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे सामर्थ्य आहे. पूजापत्रीच्या माध्यमातून पत्री मधील वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांबाबत भाविकांना माहिती मिळावी असा उद्देश पूजापत्री निर्मिती कर्त्यांचा कदाचित असावा. पूजापत्री संकलनाच्या माध्यमातून निसर्ग पर्यटन, वर्षा-पर्यटन किंवा देशाटन व्हावे, तसेच अर्पण होणारी प्रत्येक पत्री हि विविध नैसर्गिक अधिवासांचे प्रतिक आहे, त्याची काही अंशी ओळख व्हावी असा उद्देश देखील असावा. तसेच ह्या वनस्पती परसबागेत जरूर लावाव्यात व त्या गरजेनुसार वापरल्या जाव्यात असा अभिप्रेत अर्थ असावा.

दूर्वा मिळणे झाले दुर्लभ

गणेश पूजेत प्रत्येक पत्री अर्पण करताना त्या पत्रीच्या नावाचा उल्लेख असणारे स्वतंत्र श्लोकही आहेत उदा: शमी अर्पण करताना ॐ वक्रतुंडाय नम: शमीपत्रं समर्पयामि: हा श्लोक म्हणणे अपेक्षित आहे. आता बाजारातल्या उपलब्ध पत्रीत शमी ऐवजी सर्रास भेसळ केली जाणारी सुबाभूळ, वेडी-बाभूळ, दुरंगी बाभूळ आणि खैर जर शमीच्या नावाखाली शमीचा श्लोक म्हणून अर्पण केली तर ती पूजा संयुक्तिक किंवा योग्य होईल का असा प्रश्न निर्माण होतो. ‘पत्रं, पुष्पं, फलं, तोयं, योमे भक्तया प्रयच्छति’ असे साक्षात श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहे. हि सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता खरी गणेश पूजापत्री कुठली हे जाणणे आवश्यक वाटते. सदर लेखात आपण गणेश पूजापत्रीशी निगडीत असणाऱ्या विविध पैलूंचा साक्षेपाने धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरी गणेश पूजापत्री:

मधुमालती, माका, बेल, श्वेत-दुर्वा (पांढरी दुर्वा), बोर, धोत्रा, तुळस, विष्णुक्रांत (शंखपुष्पी), डाळिंब, देवदार, मरवा, आघाडा, शमी (सौंदड), डोरली, केवडा, आपटा, कण्हेर, रुई (मांदार), अर्जुन-सादडा, पिंपळ, निर्गुडी, जाई, हादगा

पत्रीच्या नावाखाली ओरबाडल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पती:

कचोरा (रानहळद), चवर, सफेद-मुसळी, कळलावी (अग्निशिखा), भुई-आमऱ्या, रान-आले (शेवरा), महाळूंग, भारंगी

पुजापत्रीत भेसळ होणाऱ्या वनस्पती:

गुडमई, तेरडा, सुबाभूळ, आंबा, उंदीरमारी, गुलबक्षी, शंकासूर, खैर, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सीताफळ, वेडी बाभूळ, पर्जन्यवृक्ष

गणेशोत्सव व गौरीपूजन काळात विकण्यासाठी वनस्पती टनावारी उपटल्या किंवा ओरबाडल्या जातात. यात पारंपरिक ग्रंथात पत्री म्हणून उल्लेखही नसलेल्या काही दुर्मिळ वनस्पतीही ओरबाडल्या जातात. यातील काही वनस्पती प्रदेशनिष्ठ असून काही औषधीही आहेत. जंगलातील प्रत्येक वनस्पतीची स्वतंत्र परिसंस्था असते. या वनस्पती त्या स्थानिक भागातून नामशेष झाल्या तर त्यावर जगणारे कीटक, माश्या, फुलपाखरांच्या अळ्या अशा सजीवांची अन्नसाखळी बाधित होवून ती परिसंस्था धोक्यात येऊ शकते.

हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी

आले कुळातील चवर, कचोरा किंवा गौरीचे हात, शेवरा ह्या वनस्पती पुजापत्रीत नमूद नाहीत, तरीदेखील त्यांच्या केवळ आकर्षक फुलोऱ्यांमुळे या दुर्मिळ वनस्पतींचे फुलोरे दरवर्षी हजारोंच्या संखेत सह्याद्री घाटमाथा, भिन्न मावळ प्रांत व गडकोटांच्या घेरापरिसरातील वनराईतून संकलित करून शहरी बाजारात विशेषत: भाजी मंडई, मुख्य बाजारपेठ परिसरात विकले जातात. केवळ दिसायला छान म्हणून या वनस्पतींची ओरबड होवू नये तसेच त्या नष्टप्राय होवू नये या उद्देशाने या पर्यावरणाला घातक असणाऱ्या कृत्याची दखल व जनसामान्यांना, प्रशासनाला तसेच निसर्गप्रेमींना खऱ्या पुजापत्रीची ओळख पटावी व पुजापत्रीच्या नावाखाली चालणारी निसर्गाची ओरबड थांबावी म्हणून पुण्यातील बायोस्फिअर्स संस्थेने ‘पूजापत्री साक्षरता अभियान’ ही एक निसर्ग चळवळ गेली काही वर्षे सातत्याने सुरु ठेवली आहे.

पूजापत्रीच्या नावाखाली दुर्मिळ वनस्पतींची सह्याद्रीतून चाललेली ओरबड कायमची बंद व्हावी यासाठी गाव पातळीवर अस्तित्वात असलेल्या स्थानिक जैवविविधता समित्या व प्रादेशिक वनविभाग यांची जबाबदारी मोठी आहे. यासाठी आवश्यक आहे शासनाची नियमावली अथवा धोरण आणि पर्यावरणीय साक्षरता. तसेच लोकांची पूजापत्री बाबत वाढती मागणी लक्षात घेता आपल्या परंपरेत नमूद असलेल्या पूजापत्रीतील वनस्पतींची शेती करून योग्यत्या दरात त्या उपलब्ध करून देणे हि काळाची खरी गरज आहे. यातून निश्चितच एक नवी हरित उद्योजगता निर्माण होवू शकेल यात तीळमात्र शंका नाही…!

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment