पाच सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांचा हंगाम सुरू. संततधार पावसामुळे फुलांचा लांबलेला हंगाम अखेर सुरू झाला आहे, कास पठार फुलांच्या ताटव्याने बहरले आहे.
सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा सथळाचा मान मिळालेल्या कास पठारावरील फुलांचा उत्सव येत्या ५ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला होतो आहे. वन विभाग, स्थानिकांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेली कास पठार व्यवस्थापन समितीने हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षी प्रमाणेच कास पठार बघण्यासाठी पर्यटकांना ऑनलाइन बुकींग करून पर्यटनासाठी यावे लागणार आहे. दहा सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकींग सुरु होणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगरांवर मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर ओसरला की साधारण ऑगस्टच्या अखेरीस रानफुलांचा हंगाम सुरू होतो. कास पठारावरही याच दरम्यान शेकडो प्रकारच्या फुलांचे ताटवे बहरतात आणि पठाराला जणू फुलांच्या गालिचाने झाकले जाते. सोशल मीडियावर या फुलांच्या पोस्ट दिसायला लागल्या की पर्यटकांची पावले कासच्या दिशेने वळतात.
हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी
पर्यटकांसाठी सोयी वाढवल्या
गेल्या काही वर्षात हंगामादरम्यान पुढे आलेल्या अडचणी, पर्यटकांच्या मागण्या लक्षात घेऊन कास पठार व्यवस्थापन समितीने काही नवीन बदल केले आहेत. पठराच्या पुढच्या बाजूला पर्यटकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या निवाऱ्या पुरत्या झोपड्या उभारल्या आहेत. पर्यटकांच्या व्यवस्थापनासाठी कास पठारा लगतच्या भागातील गावांमधील शंभर हून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पठारावर खासगी गाड्या नेण्यास, पार्किंगला बंदी आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकृत पार्किंगपासून कास पठरापर्यंतच्या मार्गावर पर्यटकांसाठी मोफत बस सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय पर्यटकांच्या उपद्रवावर लक्ष ठेवण्यासाठी या वर्षी पहिल्यांदाच सीसीटीव्हीतून वॉच राहणार आहे. पठराच्या काही मार्गांवर हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
यंदा ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाचा जोर ओसरला नव्हता, त्यामुळे फुलांना बहर येण्यास उशीर झाला. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला वन विभागाने हंगाम सुरू केला होता, मात्र यंदा चार दिवस उशीर झाला आहे. गुरुवारी सकाळी कास पठार पर्यटन हंगामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दहा सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकींग सुरु होणार आहे.
दत्तात्रय किर्दट – कास पठार व्यवस्थापन समिती
कास पठराचे शुल्क
कास पठरावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून गेल्या काही वर्षांपासून वन विभागाने नेमलेल्या व्यवस्थापन समितीमार्फत शुल्क आकारले जाते. उपद्रव करणाऱ्या पर्यटकांकडून दंडही वसूल केला जातो. पर्यटन हंगामातून जमा होणारा निधी, कास पठार आणि गावातील शाश्वत विकास कामांसाठी वापरला जातो.
कास पठाराला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना १५० रुपये प्रवेश शुल्क आहे. गाईड हवा असल्यास एका ग्रुपसाठी शंभर रुपये अधिक भरावे लागतात. तेथील निसर्गाचे नुकसान करताना कोणी आढळले तर दोन हजार रुपये उपद्रव शुल्क भरावे लागते. बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यास सहल असल्यास सवलतीच्यादरात प्रवेश मिळतो. कास पठावरासंदर्भातील सर्व माहिती, बुकींग https://www.kas.ind.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
कास पठारचे पुष्पवैभव
अभ्यासकांनी गेल्या पंचवीस-तीस वर्षात गेलेल्या संशोधनातून कास पठारावर आठशे पेक्षा जास्त प्रकारच्या फुलांच्या प्रजाती नोंदवल्या आहेत. कास पठरावा प्रामुख्याने सोनकी, तेरडा, आमरी, मंजिरी, सीतेची आसवे, वायतुरा, टोपली कारवी, कंदीलपुष्प, जंगली हळद, दीपकांडी या प्रजातींचे अनेक प्रकार बघायला मिळतात. यातील काही फुले सह्याद्रीच्या इतर पठरांवरही मोजक्या प्रमाणात आढळतात, तर काही फुले ही एंडेमिक म्हणजेच प्रदेशनिष्ठ केवळ कास पठारावरच आढळतात. दुर्मिळ प्रकारातीलही अनेक फुले या हंगामात पठारावर बघायला मिळतात. याशिवाय कीटक भक्षी वनस्पती देखील याच काळात पठारावर फुलतात
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.