डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या हवामान विज्ञानातील प्रभावी योगदानामुळे आणि विस्तृत संशोधनामुळे त्यांना Shanti Swaroop Bhatnagar Award 2024 हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ. कोल पुण्यातील, इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (IITM) येथे हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जपानमधील होक्काइडो विद्यापीठातून ‘महासागर आणि वातावरणीय गतिशीलता’ या विषयावर पीएच.डी. केली. त्यांच्या संशोधनाने भारतीय मान्सून ऋतूमध्ये विशेषत: इंडो-पॅसिफिक प्रदेशात येणारे पूर, दुष्काळ, भूतलावरील आणि सागरातील उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळ यांच्या बद्दल वैज्ञानिक समज अधिक वाढली आहे.
डॉ. कोल यांचे कार्य आंतरविद्याशाखीय आहे, हवामान बदलाची परिवर्तनशीलता, पृथ्वी प्रणालीचे मॉडेलिंग आणि सागरी परिसंस्थेतील जैवभौतिकीय परस्परसंवाद यांचा त्यात समावेश होतो. त्यांनी प्रभावशाली लिखाण केले आहे, त्यातील काही लेख नेचर या जगप्रसिद्ध नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आंतरसरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) अहवालांसाठी प्रमुख लेखक म्हणूनही काम केले आणि जागतिक हवामान संशोधन आणि त्यासंबंधीची धोरणे ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे
हेही वाचा: प्रत्येक पाऊस मुसळधार नसतो
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. कोल यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. शांती स्वरूप भटनागर पुरस्काराव्यतिरिक्त, त्यांना पृथ्वी आणि अवकाश विज्ञानातील उत्कृष्ट संशोधनासाठी AGU देवेंद्र लाल पदकाने देखील सन्मानित केले गेले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जगातील प्रथम २% शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या सन्मानांमध्ये यू. एस. नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसची कवली फेलोशिप आणि इंडियन मेटिओरोलॉजिकल सोसायटीचा यंग सायंटिस्ट पुरस्कार यांचा समावेश आहे.
डॉ. कोल यांनी विविध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनेल आणि संपादकीय मंडळांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे ज्यामध्ये CLIVAR (हवामान आणि महासागर: परिवर्तनशीलता, अंदाज आणि बदल) हिंद महासागर क्षेत्र पॅनेलसह. Nature Partner Journal, npj Climate and Atmospheric Science नियतकालिकाच्या संपादकीय मंडळांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याबरोबर अनेक नियतकालिकात संपादक म्हणून देखील भूमिका बजावतात. विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते विविध विज्ञान प्रसारक संस्था आणि स्थानिक प्रशासन बरोबर सहयोगाने काम करतात.
डॉ कोल यांचे वैज्ञानिक समुदाय आणि समाजासाठीचे योगदान हे प्रामुख्याने हवामान बदल आणि हवामानाच्या अति तीव्र घटनांशी संबंधित संशोधनाचे महत्व अधोरेखित करते. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी लागणारी अंतर्दृष्टी आणि उपाय त्यांचे संशोधन सुचवते. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्यकर्ते डॉ. विवेक शिळीमकर यांनी ही माहिती दिली.
शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचा कार्यक्रम 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे होईल.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.