विज्ञान दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरे कुठेही शोधून, कोणाला विचारून, स्वतः प्रयोग करून मिळवता येतात. अनेक प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरे गुगलवर मिळत नाहीत. त्या निमित्ताने – शोध घेण्याची, चिकित्सा करण्याची, विश्लेषण करण्याची आणि काही निष्कर्ष काढण्याची संधी सहभागींना मिळते. या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकते, त्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही, वयाची अथवा शिक्षणाची अट नाही. एकाच जागी बसून ठराविक वेळेत उत्तरे लिहिण्याचे बंधन देखील नाही.
विज्ञान रंजन स्पर्धा २०२३ ची प्रश्नावली प्रसिद्ध झाली आहे. दिलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे कोठेही शोधून, कोणालाही विचारून, स्वत: प्रयोग करून, मिळवता येतील.
स्पर्धकांनी आपली उत्तरे फुलस्केप आकारच्या कागदावर हाताने लिहून १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४११०३० या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. उत्तर पत्रिका स्विकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे. या उत्तर पत्रिकांच्या आधारावर अंतिम प्रयोग फेरीसाठी स्पर्धकांची निवड होईल. या स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ दि २ मार्च २०२३ रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे पार पडेल.
हेही वाचा: निसर्गप्रेमाचे केले करिअरमध्ये रूपांतर
आपल्या परिसरातून विज्ञानाचा शोध घ्यायला प्रेरणा मिळावी या उद्देशाने ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ही प्रश्नावली सोडवणाऱ्यांची विज्ञान दृष्टी तल्लख होईल आणि ते सारे चौकस बनतील, विश्लेषक बनतील आणि कोणत्याही फसवणूकीला बळी पडणार नाहीत. या प्रश्नावलीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसाराने आपला समाज डोळस, विचारी आणि अधिक विवेकी होईल असे मत विज्ञान रंजन २०२३ चे संयोजक श्री. विनय र. र. यांनी व्यक्त केले.
विज्ञान रंजन २०२३ प्रश्नावलीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये कॉपी पेस्ट करा :
https://mavipapunevibhag.blogspot.com/2023/01/17-3-6-2023.html
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com