Dr. Madhav Gadgil Passes Away
डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन  Dr. Madhav Gadgil Passes Away

डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन Dr. Madhav Gadgil Passes Away

जैवविविधता, पर्यावरणशास्त्राचा चालताबोलता विश्वकोष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. केंद्र सरकारने पर्यावरण, वन्यजीव संवर्धन धोरणांच्या निर्मितीसाठी  नेमलेल्या तज्ज्ञांच्या समित्यांमध्ये डॉ. गाडगीळ यांचा सहभाग होता. डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट जैवविविधतता तज्ज्ञ समितीने पश्चिम घाटातील निसर्गसंपदेचे दस्ताऐवजीकरण झाले. कोकण आणि सह्याद्रीतील डोंगदऱ्यांमधील जैववैविध्याचा खजिना सम्रग रुपात गाडगीळ यांच्या अहवालातून पुढे आला. अलीकडेच त्यांचे सह्यचला एक प्रेमकहाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.

माधव गाडगीळ यांचा जन्म पुणे शहरात झाला. शालेय शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. वडील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’ आजीव सदस्य होते. वडील आणि ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्याबरोबर फिरताना, गाडगीळ यांना जीवशास्त्रामध्ये रस निर्माण झाला. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून सागरी जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी मिळवली. पीएच्.डी.च्या अभ्यासासाठी पुढे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ते गेले. जीवशास्त्र विषयात गणितीय प्रतिमानांचा आधार असणारा प्रबंध सादर करणारे ते हार्वर्डमधील पहिलेच विद्यार्थी होते.

गाडगीळांना विल्यम बॉसर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली माशांच्या वर्तनाबद्दल जीवविज्ञानातील पीएच्.डी. मिळाली. त्यानंतर काही वर्षे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्र, स्टॅन्फर्ड विद्यापीठात मानवी जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली विद्यापीठातही त्यांनी व्याख्याने दिली. भारतात आल्यावर त्यांनी आघारकर संशोधन संस्थेते वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहिले. पुढे १९७३ ते २००४ दरम्यान ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळूरूमध्ये काम केले. यानंतर ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ ही संस्था स्थापन केली.

गाडगीळ केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते.‘निलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळांनी तयार केला. १९८६ ते १९९० या काळात ते भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्य होते. जैवविविधता परिषदेच्या सल्लागार समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. व्याघ्र संरक्षणासाठी पंतप्रधानांच्या पुढाकाराने नेमलेल्या पाच निष्णात सदस्यांपैकी ते एक होते. गाडगीळांनी अनेक शोधनिबंध लिहिले. उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन गाडगीळ यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार,सन्मानांनी गौरविण्यात आले होते. 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!