Operation Tara STR T4 तारा वाघिणीचा सह्याद्रीच्या जंगलात मुक्त संचार
Operation Tara STR T4 आठवडाभरापूर्वी ताडोबातून आलेली पूर्वाश्रमीची चंदा आणि आताची ताराने गुरुवारी सकाळी पिंजऱ्यातून बाहेर पडत, सह्याद्रीच्या जंगलात मुक्त संचाराला सुरुवात केली. जंगलात फिरण्यासाठी आता ती फीट असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. ताराच्या गळ्यात रेडिओ कॉलर घातली असल्याने सॅटलाइटच्या माध्यमातून तिची प्रत्येक हालचाल टिपण्यात येणार आहे, तसेच वन विभागाचे कर्मचारी तिच्या मागावर राहणार आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने ताराचे जंगलात जाणे हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. गेल्या आठवड्यात ताराला ताडोबा जंगलातून आणण्यात आले होते. चार दिवस ती सॉफ्ट रिलिज प्रक्रियेनुसार कुंपण घातलेल्या एका मोठ्या संरक्षित क्षेत्रात ठेवले होते. सुरुवातीला तिला खाद्य देण्यात आले, नंतर या कुंपणात सांबराला सोडले होते. ताराने सांबराची पाठलाग करून शिकार केली. त्यामुळे निसर्गात सोडण्यास ती आता फिट असल्याने वन विभागाने दोन दिवसांपूर्वी कुंपणाचा दरवाजा उघडला होता, पण त्याच एनक्लोजरमध्ये फिरत होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता ती रुबाबात एनक्लोजरमधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली.
वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे. आम्ही WII तज्ञांच्या सहकार्याने वैज्ञानिक व जबाबदार पद्धतीने तिच्या निरीक्षणाचे पुढील टप्पे कार्यान्वित करणार आहोत. हा टप्पा सह्याद्री व्याघ्र पुनर्स्थापना उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
चांदोलीत आगमनानंतर वाघीणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व habituation प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी (WII) यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे.
महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम वैज्ञानिक पद्धतीने व दीर्घकालीन धोरणांनुसार राबविला जात आहे. सदर वाघीण पर्यावरणाशी यशस्वीरीत्या अनुकूल झाली असून नैसर्गिक वर्तनही दिसून येत आहे. STR व WII पथकाकडून तिचे सतत निरीक्षण होत असल्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळेल.
एम. एस. रेड्डी, आयएफएस, मुख्य वन्यजीव संरक्षक, PCCF Wildlife महाराष्ट्र
वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण योजना
वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आली असून तिचे Satellite Telemetry व VHF Antenna Tracking च्या माध्यमातून २४ तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी Sahyadri Tiger Reserve, Chandoli National Park आणि Wildlife Institute of India यांचे प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.