जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर Junnar Shirur Leopard Relocation
मुंबई, दि. ४ – पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे Junnar Shirur Leopard. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘अर्लट’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री श्री. नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल.
गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य
बैठकीतील ठळक मुद्दे
- त्वरीत २०० पिंजरे बसविणार, आणखी १ हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार
 - नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही
 - बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार
 - नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार
 - शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार
 
वनमंत्री नाईक म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने २०० पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी १ हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले.
नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
फोटो साभार: https://wildlifesos.org/
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.