Kharai Camel Facing Challenges पोहोणारे उंट सापडले संकटात
पोहोणारे उंट सापडले संकटात Kharai Camel Facing Challenges

पोहोणारे उंट सापडले संकटात Kharai Camel Facing Challenges

जगामध्ये फक्त गुजरातमध्ये आढळणारी, कच्छच्या खारट वाळवंटी प्रदेशात राहणारी खराई ही उंटाची एक दुर्मिळ जात. उत्तम जलतरणपटू ही त्यांची मुख्य ओळख. उंट हे वाळंवटामध्ये राहतात, हे सर्वज्ञात असले तरी खराई उंट या पेक्षा वेगळे आहेत. कच्छच्या वाळवंटाच्या जवळ असलेल्या खारफुटीच्या म्हणजेच मॅनग्रुव्हच्या जंगलात, दलदलीच्या भागात खाराई उंट राहतात. खारफुटीच्या जंगलातील वनस्पती हे त्यांचे मुख्य अन्न आहे.

कच्छच्या रणात सध्या सुमारे चार हजार खराई उंट वास्तव्यास असून त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. या उंटांचे वास्तव्य असलेल्या भागात मीठ, सिमेंटचे अनेक कारखाने असे वेगवेगळे विकास प्रकल्प आल्यामुळे खारफुटीची जंगल नष्ट होत आहेत, त्यामुळे या उंटाची वसतिस्थाने, त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतीही कमी झाली आहेत. त्यामुळे ही दुर्मिळ जात नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत. या उंटाना वाचविण्यासाठी चार वर्षांपूर्वी कच्छ कॅमल ब्रीडर्स असोसिएशनने (केसीबीए) नॅशनल ग्रीन ट्रीब्युनलकडे दाद मागितली होती. यासाठी खराई उंटांचे पालन करणारे मालधारी लोक एकत्र आले आहेत. हे उंट नष्ट झाल्यास या समाजाचे उत्पन्नाचे साधन संपणार आहे. या उंटाचे दूध गायीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असल्याने त्याला बाजारात मागणीही भपूर आहे. पण उंटच संकटात सापडल्याने त्यांचे मालकही हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा: गुजरात मध्ये येणार चित्ता

त्या वेळी एनजीटी बेंचने वन विभाग, गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाला तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षात राज्यसरकार आणि प्रशासकीय यंत्रणेने काहीच ठोस केले नसल्याने एनजीटीने पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये लक्ष घालून नव्याने सुनावणी प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान एनजीटीने गुजरातच्या अधिकाऱ्यांना नवीन नोटीस बजावली आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नोटीस बजावूनही वन व पर्यावरण विभागाचे अधिकारी, कच्छचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख प्रतिवादी गैरहजर असल्याचे निदर्शनास आणून दिले. आणि सर्व प्रतिवादींना नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या.

नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या खराई उंटांचे संरक्षण आणि त्यांच्या पारंपारिक प्रजनन पद्धतींचे जतन करण्यावर भर देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे. कच्छमधील उंटांच्या या संवेदनशील अधिवासाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आत्तापर्यंत काय केले याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश बेंचने दिले आहेत. पुढील सुनावणी १९ सप्टेंबर ला होणार आहे.

image source: Grok AI

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!