Cnemaspis Brahmaputra आसाममध्ये सापडली नवीन पाल…
आसाममध्ये सापडली नवीन पाल… Cnemaspis Brahmaputra

आसाममध्ये सापडली नवीन पाल… Cnemaspis Brahmaputra

संशोधनापासून अनेक वर्षे दूर राहिलेल्या जंगलातील पालींच्या विश्वाचा आता मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासकांमुळे दहा वर्षात अनेक नवीन पालींचा शोध लागला आहे. जैववैविध्याची श्रीमंती असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलातील नवनवीन पाली प्रकाशात येत असतानाच आता भारतीय आणि इंडोनेशियन वन्यजीव शास्त्रज्ञांनी आसाममध्ये नवीन पाल शोधली आहे.

उत्तरपूर्व भारतातील जैवविविधतेने समृद्ध आणि घनदाट परिसरात भारतीय आणि इंडोनेशियन संशोधकांच्या टीमने या नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लावला आहे. हा शोध वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी व ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अमित सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून, सरीसृपांच्या जैवविविधतेच्या अभ्यासात एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे.

नवीन पाल आसाममधील नॉर्थ गुवाहाटी परिसरात, ब्रह्मपुत्रा नदीच्या प्राचीन दरीत आढळली, ही नदी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सातत्याने वाहणाऱ्या नदी प्रणालींपैकी एक आहे. त्यामुळे या पालीचे नाव निम्यासपिस ब्रम्हपुत्रा असे ठेवण्यात आले आहे. या संशोधनाचे नेतृत्व सुप्रसिद्ध भारतीय वन्यजीव तज्ज्ञ डॉ. अमित सय्यद यांनी केले आहे. इंडोनेशियातील सरीसृप तज्ज्ञही या शोधाचा भाग आहेत. या शोधामुळे भारतातील सरीसृप जैवविविधतेत मोलाची भर पडली असून निम्यासपिस वंशाच्या उत्क्रांतीशास्त्रीय आणि जैवभौगोलिक अभ्यासातही नवे दालन खुले झाले आहे.

हेही वाचा: देशातील पहिले फुलपखरू अभयारण्य

नवीन प्रजाती निम्यासपिस पुदीयाना प्रजाती समूहाशी संबंधित असून, पूर्वी हा समूह केवळ श्रीलंकेत आढळतो असे मानले जात होते. ही केवळ दुसरी प्रजाती आहे जी भारताच्या भूमीत आढळली आहे, त्यामुळे हिचा शोध पुदीयाना गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या लहानशा दिसणाऱ्या पालीची लांबी फक्त ३०.८ ते ३५.७ मिमी असून, ती जमिनीवर तसेच दगडावर राहणारी आणि दिवसा सक्रिय असणारी प्रजाती आहे. तिच्या शरीरात काही विशिष्ट वैशिष्ट्ये असून, ती आपल्याला या वंशाच्या उत्क्रांतीबाबत महत्त्वाची माहिती देणारा शोध ठरणार आहे. निम्यासपिस पुदीयाना हा गट पालीच्या गेकोनीड कुटुंबातला असून, या पाली सहसा दगडी भाग, तसेच दाट जंगलांमध्ये आढळतात. त्यांच्या पुरातन वंशपरंपरेमुळे वैज्ञानिकांच्या विशेष अभ्यासाचा विषय ठरला आहे. या आधीपर्यंत या गटातील निम्यासपिस पुदीयाना, निम्यासपिस मोलिगोडाई, आणि निम्यासपिस मनोई या प्रजाती केवळ श्रीलंकेतच आढळल्याचे नोंद आहेत.

निम्यासपिस ब्रम्हपुत्रा ही नवीन प्रजाती निम्यासपिस आसामेंसीस शी समरूप वाटत होती. भारतात पुदीयाना या समूहातील एकमेव पाल असल्याने ही निदर्शनात आली नव्हती. शास्त्रज्ञांनी तिचा बारकाईने अभ्यास करून तिची काही ठळक वैशिष्ठे शोधून काढली. तिचा डीएनए अभ्यासले आणि माइटोकॉन्ड्रियल ND2 जनुकावर आधारित विश्लेषण केले. त्यात ही पाल नवीन असल्याचे स्पष्ट झाले. हा शोध उत्तरपूर्व भारतातील अद्याप अज्ञात असलेली जैवविविधता अधोरेखित करतो

डॉ. अमित सय्यद (ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशन)

या भागातील जैविक वैशिष्ट्यपूर्ण नदी खोरे आणि प्राचीन डोंगररांगांमध्ये अजून अनेक अज्ञात प्रजाती लपलेल्या असण्याची शक्यता आहे. या शोधानंतर, भारतामध्ये पुदीयाना गटातील केवळ दोन प्रजाती ज्ञात आहेत, पण घनदाट जंगलात अजूनही त्यांचा अभ्यास झालेला नाही. हा शोध केवळ टॅक्सोनॉमिक यश नाही, तर तो जैवविविधतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उलगडा आहे. काही प्रजाती कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशांत विभक्त झाल्या आणि पसरल्या हे दाखवतो. हा वैज्ञानिक शोध जगभरातील संशोधकांकडून स्वागतार्ह मानला जात आहे.

फोटो: डॉ. अमित सय्यद

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!