सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये काळा रानकुत्रा Rare sighting of Melanistic Wild Dog in Sahyadri Tiger Reserve
कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील Sahyadri Tiger Reserve बफर झोन मधील एका गावात भटकंती दरम्यान गेले असता त्यांना काळ्या रंगाचा रान कुत्रा Melanistic Wild Dog नजरेस पडला. या घटनेचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी तत्परतेने याबद्दल साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.
वनविभागाच्या नोंदी नुसार १९३६ मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर.सी. मॉरिस यांनी एक काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) नोंदवला होता.
रानकुत्रा कोळसूंद, कोळशिंदा, ढोल, अथवा वाईल्ड डॉग या नावांनी पण ओळखला जातो. याचे शास्त्रीय नाव Cuon Alpinus कुओन अल्पिनुस आहे.
पावसाळ्यातील साहसी पर्यटनातील धोके आणि घ्यावयाची काळजी
रानकुत्रा रंगाने तांबूस लालसर असतो. कान टोकाकडे गोलाकार असतात. हनुवटी खालचा भाग पसरट असतो. रानकुत्र्याच्या शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. यांची उंची ४३ ते ४५ से.मी. पर्यंत असते तर शरीराची लांबी ३ फुटापर्यंत असते. नराचे वजन २० किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते. कळपाने राहणाऱ्या या प्राण्याचे वास्तव्य जंगलामध्ये दिसून येते. रानकुत्री कळपाने शिकार करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या व ताकदवर प्राण्याची शिकार करण्यास मदत होते. हरीण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे. कळपातील प्राण्यांची संख्या जास्त असल्यास ते गव्यासारख्या मोठ्या प्रण्याचीसुद्धा शिकार करु शकतात. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान यांची पिल्ल बघायला मिळतात. मादी एका वेळी ४ ते ६ पिलांना जन्म देते. पाटील यांनी पाहिलेला रान कुत्रा हा संपूर्ण काळा होता.

विभागीय वनाधिकारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प स्नेहलता पाटील , सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी सदर परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती व अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना देण्यात आल्या आहेत.
जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे अशी स्थिती जिथे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्यपणे जास्त प्रमाण असते, ज्यामुळे त्याचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद होतो, बहुतेकदा काळा. सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यासह विविध प्रजातींमध्ये हे अनुवांशिक फरक दिसून येतो, जिथे ते काळे फर, पंख किंवा त्वचेच्या स्वरूपात प्रकट होऊ शकते. ह्या पूर्वी काळा बिबट्या सह्याद्री मध्ये नोंद झाला आहे.
मेलेनिस्टिक म्हणजेच काळ्या रान कुत्र्याची ही नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता अधोरेखित करते.
सर्व फोटो: दिग्विजय पाटील, कराड.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.