चाळकेवाडी पठारावर सापडली नवीन पाल Hemidactylus Amarsinghi Satara Gecko
सातारच्या चाळकेवाडी पठारावर एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या नवीन प्रजातीच्या शोधामुळे महाराष्ट्रातील पठारावरील परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित होते.
या पालीला हिमीडक्टायलस अमरसिंघी Hemidactylus Amarsinghi हे नाव देण्यात आले आहे. इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून पालीला हे नाव देण्यात आले आहे.
हा शोध पाच वर्षांच्या अथक संशोधनाचा परिणाम असून, वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद, राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. अमित सय्यद (ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशन) यांनी केले असून, त्यांनी फील्ड वर्क, प्रयोगशाळा चाचण्या आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर कार्य पहिले आहे. त्यांचे हे संशोधन झूटाक्सा (Zootaxa) या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. अमित सय्यद यांनी या आधीही भारतातील विविध जंगलातून बऱ्याच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे पण विशेष म्हणजे साताऱ्यातून आज पर्यंत त्यांनी चार नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये एक बेडूक, एक विंचू आणि दोन पालीचा समावेश आहे.
हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चाळकेवाडी पठार आणि येथील पर्यावरण वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासन, संशोधक, आणि निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन या संवेदनशील परिसंस्थेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. हा शोध आपणास हे शिकवतो की, निसर्गातील प्रत्येक प्रजाती, ती कितीही लहान असली तरी, परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
डॉ. अमित सय्यद (ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशन)
ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटकभक्षक म्हणून ती डास, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय, ही पाल शिकारी पक्षी, साप, आणि लहान सस्तन प्राण्यांसाठी खाद्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते, म्हणूनच हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाचा आहे.
चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलांसाठी येण्या जाण्याचा मार्ग आहे. हे पठार स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणि शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरले आहे. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथील परिसंस्था धोक्यात येत आहे. चाळकेवाडी पठार हे बहुतांश खासगी मालकीचे असून येथे वाढते पर्यटन प्रवाह, व्यावसायिक उलाढाल, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, लाल मातीसाठी उत्खनन, पठारावरील खडकांचे वाहतूक, आणि पर्यटक वाहने यांमुळे येथील नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे. परिणामी, अनेक स्थानिक प्रजातींना विलुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे असे डॉ. अमित सय्यद यांनी सांगितले
हेही वाचा: Padmashree Chaitram Pawar
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.