लोकसहभागातून गावाला स्वावलंबी करणारा अवलिया Padmashree Chaitram Pawar
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये धुळे जिल्ह्यातील दुर्गम अशा बारीपाड्यातील एका अवलियाला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकसहभागातून जंगल उभारणारे चैत्राम पवार असे या अवलियाचे नाव आहे.. वनसंवर्धनासाठी झटणाऱ्या पवार यांच्या कार्याचा या पुरस्काराने यथोचित सन्मान झाला आहे…
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी चैत्राम पवार यांची कहाणी अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे. चैत्राम पवार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम अशा बारीपाडा या वनवासी पाड्यातील रहिवासी. साधारण चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत हा पाडा ओसाड होता, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या बिकट होती. पाणी नाही, त्यामुळे शेतीही नाही. रोजगार, हाताला काम नसल्याने पाड्यात व्यसनाधिनता वाढली होती.
सभोवतालचे नकारात्मक वातावरण एका तरुणाला सतत खटकत होते. हे चित्र बदलले पाहिजे, अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती. अखेर त्याने पुढाकार घेतला. गावातल्या समविचारी लोकांना त्याने एकत्र आणले. गरज पडेल तिथे श्रमदान करायला सुरुवात केली. हळूहळू काम करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. गावाचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्याबरोबरच अनेक महत्वाची कामे त्यांनी पूर्ण केली. लोकचळवळीतून सुरू झालेल्या या विकास कामांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. आदर्श गाव कसे असावे या आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक चीनमधील एका गावाने तर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार बारीपाडा या पाडयाने पटाकविला. पुरस्काराने चैत्राम पवार यांच्याबरोबरच गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि लोकसहभागातील उपक्रमांना बळही मिळाले.
हेही वाचा: किरकसाल होणार का जैवविविधता वारसा स्थळ ?
गावाच्या शाश्वत विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र काही कडक नियम स्वत:वरच घालून घेतले. गावातील मोकळ्या रानांवर चराई बंदी, वृक्षतोड बंदी, दारुबंदी ठरली. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची मोठी रक्कम निश्चित करण्यात आली. बघता बघता गावाचे रुप पालटले आज गावताली माळरान बहरले आहेच, शिवाय गावाशेजारी सुमारे साडे चारशे हेक्टर वनक्षेत्रात लोकसहभागातून जंगल संवर्धन करण्यात आले आहे. त्यामुळे या जंगलात आता अनेव वन्यप्राणी, पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळाला आहे. वनसंपदाही बहरली आहे.
पाणी टंचाई दूर केल्यास अनेक प्रश्न निकालात काढता येतील या विचाराने चैत्राम पवार यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन काही वर्षांपूर्वी जलव्यवस्थानास सुरुवात केली. यासाठी श्रमदानातून साडे चारशेहून अधिक दगडी बंधारे, चर बांधले. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यास सुरुवात झाली. भूजलपातळीही वाढली. पाण्याने शेतीला बळ मिळाले. कौतुकाची बाब म्हणजे एकेकाळी पाण्यासाठी वणवण करणाऱ्या बारीपाडा गावातील गावकरी आजूबाजूच्या आठ गावांना पाणी पुरवठा करत आहेत. गावात आज पशुधनही समाधानकारक असून शेतकरी शेतीला पूरक व्यवसायांमध्येही अग्रेसर आहेत. गावाला नैसर्गिक साधनांनी समृद्ध करत असतानाच चैत्राम पवार यांनी गावकऱ्यांच्या साक्षरतेला बळ दिले. रात्रीच्या शाळा सुरू करून प्रौढांना शिक्षणाचे धडे दिले. शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दंडही लागू केला. आज पाडयावरील आदिवासीमुळे प्राध्यापक, डॉक्टर अधिकारी वर्गापर्यत पोहोचले आहेत. गावतील महिलाही बचतगटांमुळे स्वावलंबी झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतही बारीपाडा आग्रही आहे. शाश्वत विकासाची कास धरताना गावाने अलीकडेच सोलार प्रकल्पांचे स्वागत करून सौर ऊर्जा निर्मिती, बायोगॅस निर्मिती सुरु केली आहे. गावाचा आदर्श प्रवास पाहून अनेक मानाचे पुरस्कारही बारीपाड्याने पटकाविले आहेत. चैत्राम पवार यांच्या कष्टाचे, गावकऱ्यांनी साथ दिल्याने चीज झाले आहे.
फोटो : सोमनाथ माळी यांच्या फेसबूक वॉल वरुन साभार ..
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.