उपवासाचा हक्काचा पदार्थ – साबुदाणा खिचडी Sabudana Khichadi
उपवासाचा हक्काचा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी Sabudana Khichadi… हे वर्षानुवर्षांचे समीकरण बनले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे मुबलक उपलब्ध असणारा हा साबुदाणा आपले भारतीय पीक नाही, हे आजही अनेकांना माहिती नाही. उलट उपवासाला साबुदाण्याची खिचडी चालते म्हणजे त्याचे संदर्भ पुराणकथा, खाद्य संस्कृतीच्या प्राचीन ग्रंथांमध्येही असतील असे अनेकांचा समज आहे.
गंमत म्हणजे साबुदाणा हा मुळचा दक्षिण अमेरिकेतील, ब्राझिलमधला. जगभरातील विविध देशांमध्ये व्यापाराच्या निमित्ताने वसाहती विस्तारत असताना युरोपीय नागरिकांनी वेगवेगळ्या पिकांची सरमिसळ केली. अनुकूल हवामान असलेल्या वेगवेगळ्या प्रातांमध्ये त्यांनी इतर देशांमधील पिकांचे उत्पादन करून पाहिले आणि नकळत त्या भागातील वसाहतींनीही हे बदल आत्मसात केले. साबुदाण्याचा, त्या खिचडीतील मिरची, बटाटा देखील मुळेच भारतीय नाहीत.
ऐतिहासिक संदर्भानुसार साधारण दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी साबुदाणा भारतात आला. त्यावेळी त्याचे पीक येथे घेतले जात नव्हते. थेट साबुदाणा भारतात येत असे. कालांतराने साबुदाण्याच्या पीकास भारतातील काही राज्यांमधील वातावरण अनुकूल असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या कंदाची शेतीही सुरू झाली. १९४० च्या दशकात तमिळनाडू राज्यात साबुदाण्याचा पहिला उभा राहिला.
हेही वाचा: जीवाश्म इंधनांच्या उच्चाटनासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक नवकल्पना निर्माण झाल्या पाहिजेत
साबुदाणा मूळ एक एक पिष्टमय खाद्यपदार्थ. पाम वृक्षांच्या – ॲरेकेसी कुलातील – विशेषत: मेट्रोझायलॉन सॅगो या वृक्षापासून साबुदाणा तयार केला जातो. मेट्रोझायलॉन प्रजातीत एकूण सात जाती असून त्या पॅसिफिक महासागराच्या सामोआ, न्यू गिनी, सॉलोमन, मलुकू, फिजी या बेटांवर पाणथळ जागी ही वनस्पती वाढते. मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स या देशांत या वनस्पतींची लागवड केली जाते.
ऊसाप्रमाणे त्याचे देठ वाढते. पूर्ण वाढ झाल्यावर त्याची कापणी करतात. ऊसाचे काप करतो, त्याप्रमाणे याचेही काप केले जातात. कसावांवरील कठीण सालींना बाजूला केल्यानंतर रताळ्या प्रमाणेत एकंदमुळा प्रमाणे ते काप दिसतात. त्यांनी दळून रवाळ पीठ तयार केले जाते. पाण्यामुळे पीठ भेसाळते. पुढील प्रक्रियेत स्टार्च वेगळा करून पिठूळ भाग वेगळा केला जातो. त्याला वाळवून पुन्हा लगदा करून कारखान्यात बारीक पांढरे गोळे केले जातात. त्यांना सपाट तव्यावर किंवा कढईत भाजतात. हे कडक पांढरे गोळे म्हणजे ‘पर्ल सॅगो’ म्हणजेच साबुदाणा.
आपल्याकडे साबुदाणा उपवासाला का खाल्ला जातो, याचे ठोस उत्तर अद्याप कोणाला सापडलेले नाही. त्याबद्दल वेगवेगळ्या मिमांसा केल्या जातात. आपल्याकडे उपवासाला कंद खाण्याची पद्धत आहे. साबुदाणा हे देखील एक कंद असल्याने त्याची उपवसाच्या पदार्थांमध्ये निवड झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते.
विश्वकोषामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साबुदाणा तयार करतात. मलेशियामध्ये पाम वृक्षांपासून, अमेरिकेमध्ये सायकस वृक्षाच्या भेंडेपासून, जावामध्ये रताळ्यांपासून, तर भारतामध्ये ‘टॅपिओका’ वनस्पतींपासून साबुदाणा तयार करतात. इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडून साबुदाण्याचा सर्वांत अधिक पुरवठा केला जातो. अनेक देशांत साबुदाण्याचे पीठ वेगवेगळ्या मिसळतात. सुती कापडास कडकपणा आणण्याकरिता कापडगिरण्यांत साबुदाण्यातील स्टार्च खळीप्रमाणे वापरतात.
Photo by VD Photography on Unsplash
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.