तेलापासून मातीकडे – एक महत्त्वपूर्ण बदल Sadhguru Save Soil COP29
अझरबैजान, बाकू येथे आयोजित २०२४ च्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP29 मध्ये Save Soil माती वाचवा या मोहिमेचे संस्थापक ‘सद्गुरू’ सहभागी झाले आहेत. २०२२ मध्ये सद्गुरूंनी सुरू केलेल्या ‘माती वाचवा’ मोहिमेचे उद्देश – तातडीच्या माती संकटाला सामोरे जाणे, मातीच्या आरोग्यासाठी जागतिक पाठिंबा मिळवणे आणि शेतजमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी जगभरातील नेत्यांना धोरणे आखण्यास प्रोत्साहित करणे – हे आहेत.
मातीच्या पुनरुज्जीवनासाठी जागतिक स्तरावरील प्रयत्नांचे नेतृत्व करत, सद्गुरू हवामान बदलाच्या समस्येवरील महत्त्वाच्या उपायांपैकी एक म्हणून मातीच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी COP29 परिषदेत प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्या संवादांमध्ये ते शेतकऱ्यांची उपजीविका आणि अन्न सुरक्षा या घटकांवरही भर देत आहेत, जे हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
मातीच्या ऱ्हासाबद्दल बोलताना सद्गुरू म्हणाले, “मातीचा ऱ्हास ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. पण त्याबद्दल कोणी बोलत नाही; मागील दोन COP पासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत आणि किमान आता आपण ‘हरित जग’ याविषयी बोलत आहोत. जेव्हा आपण ‘हरित जग’ म्हणतो, तेव्हा आपण या ग्रहाला नवीन रंगात रंगवण्याचा विचार करत नाही; आपण अधिक हिरव्या पानांचा विचार करत आहोत कारण आपण या ग्रहावर जे प्रत्येक नवीन हिरवं पान उगवतो, जे प्रत्येक अतिरिक्त हिरवं पान उगवतो ते हवामान बदलाच्या दिशेने टाकलेले एक छोटं पाऊल आहे.”
भारतामध्ये, लहान आणि लघु शेतकरी यांची संख्या एकूण कृषी कार्यबलाच्या सुमारे ८६% आहे, जे एकूण कृषी उत्पादनात जवळपास ५०% योगदान देतात. शेतकऱ्यांसाठी – विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी – अधिक सुलभ हवामान वित्तपुरवठ्यासाठी बोलताना सद्गुरू म्हणाले, “सध्या, या शेकडो दशलक्ष शेतकऱ्यांना एकूण हवामान वित्तपुरवठ्याच्या केवळ ०.८ टक्के इतकाच हिस्सा मिळू शकतो. जर या शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतींकडे वळण्यासाठी आर्थिक पाठिंबा मिळाला नाही, तर अन्न सुरक्षेसंदर्भात जागतिक आव्हानं निर्माण होणार आहेत.” हवामान वित्तपुरवठा म्हणजे विशेषकरून हवामान समस्यांवर मात करणाऱ्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी असलेला निधी.
हवामान संभाषणात जीवाश्म इंधनांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याची नोंद घेत, सद्गुरू म्हणाले, “आपण सतत जीवाश्म इंधनांच्या उच्चाटनाविषयी बोलत आहोत. होय, हे घडलंच पाहिजे. हा बदल घडला पाहिजे. पण आपली इच्छा आहे म्हणून ते घडणार नाही. यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक नवकल्पना निर्माण झाल्या पाहिजेत. तुम्ही किंवा मी ‘ते चांगलं नाही’ असं म्हणतो आहे म्हणून जग तेल वापरणं सोडून देणार नाही. यासाठी ठोस पर्याय समोर यायला हवेत.”
एका महत्त्वपूर्ण घडामोडीत माती वाचवा मोहिमेने उझबेकिस्तानच्या पर्यावरण मंत्रालयासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्यामध्ये जमीनीची पुनर्स्थापना आणि मातीच्या आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्याची वचनबद्धता आहे, तसेच यात अरल समुद्राच्या आसपासच्या निकृष्ट जमिनीचाही समावेश आहे.
या सामंजस्य कराराबद्दल बोलताना, माती वाचवा मोहिमेच्या मुख्य विज्ञान अधिकारी प्रवीणा श्रीधर म्हणाल्या, “आम्ही जमिनीच्या ऱ्हासाच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी उझबेकिस्तानमधील अरल समुद्रासोबतच जगभरात सहकार्य करण्यास उत्सुक आहोत.”
“आपण ज्या उपायांचा पाठलाग करत आहोत त्याच्या तुलनेत आपल्या पायाखालची माती हाच खरा उपाय आहे. जर आपण या मातीवर काम केलं तर ते हवामान, आपली अन्नसुरक्षा आणि भावी पिढ्यांवर कायमस्वरूपी परिणामकारक ठरणार आहे.”
या परिषदेच्या आधी, ‘Save Soil’ ‘माती वाचवा’ मोहिमेने युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) या संस्थेसोबत धोरणात्मक शिफारशी सामायिक केल्या. या शिफारशी हवामान वित्तपुरवठ्याकडे लक्ष वेधतात – हा निधी विशेष करून हवामान समस्यांशी लढणाऱ्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी आहे – ज्यामध्ये शेतजमिनीच्या पुनरुज्जीवनावर विशेष भर दिला आहे. या शिफारशींना ७७ नामांकित जागतिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे, जो या मोहिमेच्या प्रभावाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा अधोरेखित करतो.
हेही वाचा: हवेची गुणवत्ता खालावली म्हणजे काय ?
कॉन्शस प्लॅनेट – माती वाचवा या मोहिमेचा उद्देश मानवतेला भेडसावणाऱ्या मातीच्या भयंकर ऱ्हासाकडे लक्ष वेधणे आणि जगातील १९३ देशांमध्ये मातीच्या पुनर्जीवनासाठी सरकारी धोरणांमध्ये बदल घडवून आणणे हा आहे. मार्च २०२२ मध्ये, सद्गुरूंनी मोटारसायकलवरून २७ देशांमध्ये १०० दिवसांचा कठीण असा ३०,००० किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी सरकारी नेते, प्रभावशाली व्यक्ती आणि सर्वसामान्य जनतेची भेट घेतली आणि ४ अब्ज लोकांपर्यंत पोहोचले. या चळवळीने शेतजमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी तीन-स्तरीय रणनीती सुचवली आहे: – शेतकऱ्यांना सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना कार्बन क्रेडिट्स (हवामान बदलाशी लढण्यासाठीचे विशेष प्रमाणपत्र) मिळण्यास मदत करणे आणि जास्त सेंद्रिय घटक असलेल्या मातीत पिकवलेल्या उत्पादनांना बाजारपेठेत प्राधान्य देणे.
या चळवळीने कावेरी कॉलिंग सारख्या उपक्रमांद्वारे आधीच लक्षणीय यश मिळवले आहे, ज्यामुळे २,२९,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना वृक्षआधारित शेतीकडे वळण्यास मदत झाली आणि त्यांचे उत्पन्न ३ ते ८ पट वाढले. याशिवाय, या चळवळीने २७,००० शेतकऱ्यांना पुनरुज्जीवन शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.