Honey Badger Ratel Wildlife Week दुर्मिळ झालेले चांदी अस्वल
दुर्मिळ झालेले चांदी अस्वल  Honey Badger Ratel

दुर्मिळ झालेले चांदी अस्वल Honey Badger Ratel

भारतातील जंगलांमध्ये आढळणारा चांदी अस्वल हा एक वैशिष्ट्यपूण वन्यप्राणी. इंग्रजीत त्याला हनी बॅजर, रॅटल Honey Badger, Ratel या नावाने ओळखले जाते. तर मराठीत चांदी अस्वल किंवा बाजरा या नावाने ओळखतात. वर्षानुवर्षे जंगलात नियमित भटकंती करणाऱ्यांपैकी फार कमी जणांना हा प्राणी दिसला आहे, इतका तो दुर्मिळ आहे. त्याचा वावर असलेल्या भागात कॅमेरा ट्रॅप लावून वन्यजीव अभ्यासक आणि वन विभागाने त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ अलीकडील काही वर्षात मिळविली आहेत.

चांदी अस्वल हे प्रामुख्याने आफ्रिका, आशियामध्ये भारत, नेपाळ आणि तुर्कस्तानच्या काही जंगलांमध्ये आढळतात. भारतात मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व जंगलांमध्ये त्यांचा कमी अधिक प्रमाणात वावर आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर चांदी अस्वल आकाराने मांजरापेक्षा थोडे मोठे आणि कुत्र्यापेक्षा लहान असते. त्याचे शरीर बळकट असते. डोक्यापासून शेपटीपर्यंतचा पाठीचा भाग करडा ते फिकट पिवळा किंवा पांढरा असतो. याउलट खालचा भाग तपकिरी किंवा काळा असतो. आफ्रिकेतील हनी बॅजरच्या रंगामध्ये थोडा फरक असून ते अधिक गडद रंगाचे असते. हे प्राणी बिळ करून किंवा दगडाच्या कपारीत राहतात. ते निशाचर असल्याने रात्री जोडीने भटकंती करतात. चांदी अस्वल जमिनीवरच राहत असले तरी शिकारीच्या शोधात अनेकदा ते झाडांवरही चढतात. लहान मोठे कीटक, बिळात राहणारे लहान सस्तन प्राणी, पाली सरडे, कासवे व विषारी अगर बिनविषारी साप हे त्यांचे खाद्य. अनेकदा मेलेले प्राणीही ते खातात. त्यांना मध खूप आवडतो म्हणूनच बहुदा त्यांना हनी बॅजर नावर पडले असावे.

निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – WILDLIFE WEEK ONLINE QUIZ

हॅनी बॅजर उत्तम शिकारी असतात, त्यांची नख आणि दात तीक्ष्ण, बळकट असतात. त्यांचे कातडे कणखर असल्याने त्यांची शिकार करणे शत्रूसाठी अवघड जाते. साळींदराचे काटे किंवा मधमाशांच्या चाव्याचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. या पूर्वी भारतात हनी बॅजरला पकडून पाळण्याचे प्रयोग काहींनी केले पण ते अयशस्वी ठरले असे सांगितले जाते.

वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेच्या वेळी वन्यप्राणी प्रेमींना मेळघाटमध्ये काही वर्षांपूर्वी चांदी अस्वल दिसले होते. यानंतरही याच जंगलात काहींना हा प्राणी दिसला. गेल्याच महिन्यात उत्तराखंडमधील एका वनक्षेत्रात हनी बॅजरचा फोटो आणि व्हिडिओ कॅमरा ट्रॅपमध्ये दिसला. या प्राण्यांवर अजून संशोधन करण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

फोटो स्त्रोत: Wikimedia Commons

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!