फुलपाखरांच्या गावात रंगला फुलपाखरू महोत्सव Wildlife Week Butterfly Festival Parpoli
जैववैविध्याने प्रचंड श्रीमंत असलेल्या आंबोलीच्या जंगलात, रानावनात मोठा नैसर्गिक खजिना दडलेला आहे. बेडूक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्यांना या जंगलात वाव आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या जंगलात, गावांभोवतीच्या जंगलात आढळतात. तर फुलपाखरु प्रेमींसाठी आंबोली नेहमीच आकर्षण ठरते. कौतुकाची गोष्ट म्हणजे या गावातील नागरिक, तरुण मंडळी आणि निसर्गप्रेमी मंडळीही मोठी हौशी आहेत. रानावनातील उपजांवर आपण अवलंबून आहोत, याचं भान त्यांना असल्याने जंगलातील जैवविविधता वाचविण्यात त्यांचा सहभाग असतो.
गेल्या काही वर्षात या भागात काम करणाऱ्या काही निसर्गप्रेमी संस्था, वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण अभ्यासकांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हा बदल घडलाय. त्यांनी राबविलेल्या उपक्रमांपैकीच एक भन्नाट उपक्रम म्हणजे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेला फुलपाखरू महोत्सव. आंबोलीतील मलबार नेचर कान्झर्वेशन क्लब आणि वन विभाग यांच्यावतीने काही वर्षांपूर्वी फुलपाखरू महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील फुलपाखरू अभ्यासक सहभागी झाले होते. त्या वेळी निसर्ग अभ्यासक रमण कुलकर्णी, फारूक मेहतर, हेमंत ओगले, काका भिसे, सायली पलांडे यासंह उपस्थित निसर्गप्रेमींनी पारपोली या गावाला फुलपाखरांचे गाव अशी ओळख देण्याच्या कल्पनेवर चर्चा केली आणि गावकऱ्यांनीही ती उचलून धरली.
वन्यजीव सप्ताह: चिमूकलं हरिण झालंय दुर्मिळ
आपल्या महाराष्ट्रात साधारण २३० पेक्षा जास्त प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. त्यातील दोनशेपेक्षा जास्त फुलपाखरांच्या जाती आंबोलीमध्ये आढळतत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही फुलपाखरे अधिक सक्रीय असतात. गंमत म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावात सुमारे दोनशे प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. सदर्न बर्ड विंग हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरूदेखील या गावात सापडते. याशिवाय क्रुझर, पाय फ्लाय, जीगर, रेडस्पॉट, ड्युक यासारखी सुंदर फुलपाखरे आढळतात.
निसर्गरंग वन्यजीव सप्ताह प्रश्नमंजूषा – WILDLIFE WEEK ONLINE QUIZ
गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील फुलपाखरांचा अधिवास असलेल्या रानाला, झाडोऱ्याला, जंगल या वसतिस्थानांचे संवर्धन व्हावे, पर्यटनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने महोत्सवात पारपोली गावाला सन्मानित करण्यात होते. गावाकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे अभ्यासकांनीही त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. बघता बघता या गावाने आता फुलपाखरांचे गाव ही ओळख मिळवली असून वन्यजीव अभ्यासक, प्रेमी आंबोलीला जातात, त्यावेळी या फुलपाखरांच्या गावाची आवर्जून चौकशी करतात. गावकऱ्यांनी पर्यटकांसाठी फुलपाखरू वॉकही ठरवले आहेत. तरुण मंडळी पर्यटकांना फिरायला घेऊन जातात.
राज्य सरकारनेही आता या गावाला फुलपाखरांचे गाव जाहीर केले आहे. गेल्या वर्षी वन विभागाने स्थानिक लोकांच्या सहभागातून फुलपाखरू महोत्सव पुन्हा एकदा आयोजित केला होता. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदाही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन झाले असून जानेवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. फुलपाखरांचा हंगाम सुरू झाल्याने याच काळात पर्यटकांना महोत्सवाच्या निमित्ताने बोलावता येईल आणि त्यातून पर्यटनाला चालना देण्याचा गावकऱयांचा उद्देश आहे. यासाठी गावकऱ्यांनी पर्यटकांच्या निवासाची, आदरातिथ्याची आणि भटकंतीची सोय केली आहे.
वन्यजीव सप्ताह: तणमोराला वाचवायला हवं Lesser Florican
फुलपाखरांना जपले, त्यांची संख्या वाढत गेली तर आपली जैवविविधता अधिक समृद्ध होणार आहे. फुलपाखरांची काळजी घेतली तर पर्यटक त्यांना बघायला येणार आहेत, त्यातून नवीन रोजगार मिळणार आहे. याची जाणीव पारपोली गावातील नागरिकांना आहे. त्यामुळे फुलपाखरांसाठी ते नेहमीच सकारात्मक असतात. पारपोरी गावाचे अनुकरण इतर गावांमध्येही झाले पाहिजे, असं अभ्यासक सांगत आहेत.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.