Lesser Florican Conservation Wildlife Week
तणमोराला वाचवायला हवं  Lesser Florican

Lesser Floricanतणमोराला वाचवायला हवं

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात पूर्वी तणमोर Lesser Florican हा पक्षी मोठ्या संख्येने आढळत होता. आता संपूर्ण देशात त्यांची संख्या दोन हजारांपेक्षाही कमी झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या शंभरही राहिलेली नाही. शिकारीमुळे प्रामुख्याने तणमोरांची संख्या ९० टक्क्यांनी घटली.

तणमोर हा स्थलांतरी पक्षी. भारतात आढळणाऱ्या बस्टर्ड कुटुंबातील तणमोर हा सर्वात लहान पक्षी. विस्तीर्ण पसरलेली माळराने हा तणमोराचा अधिवास. कोंबडी पेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला हा पक्षी रंगाने पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखाचा रंग मात्र पांढरा असतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. हा पक्षी अत्यंत लाजाळू असल्याने माणसासमोर पटकन येत नाही. लहान मोठे कीटक, गवताचे अंकुर आणि धान्य हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊ Caracal या भन्नाट प्राण्याची माहिती

गवताळ रानांवर उंच उड्या मारत जाणारा मोराप्रमाणे डौलदार तुरा असलेला तणमोर सगळ्यांचे लक्ष वेधतो. विशेषत: पावसाळ्यात विणीच्या हंगामात मादीला आकर्षिक करण्यासाठी नर दिवसाला तीनशे ते चारशे उंच उड्या मारतो. याच काळात त्याची करण्यासाठी शिकारीही सक्रीय असतात. पावसाळा संपल्यावर ते दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करतात.

याच गवताळ प्रदेशांत, माळरानांवर मोठ्या संख्येने राहणाऱ्या माळढोक पक्ष्याची संख्या जशी कमी झाली, तशी वन्यजीव अभ्यासकांनीही तणमोराच्या बाबतीतही धोक्याची घंटा वाजवली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये नान्नज हे अभयारण्य माळढोक या पक्ष्यासाठी राखीव ठेवले आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर हीच वेळ तणमोरांच्या बाबतीतही येईल, असा इशारा अभ्यासकांनी दिला होता. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी काही वर्षांपूर्वी भारत सरकाराने तणमोर पक्ष्याचा विशेष स्टँम्पही प्रकाशित केला होता.

हेही वाचा: कारवी – रानफुलांमधील अत्यंत देखणी वनस्पती

वीसएक वर्षापूर्वी महाराष्ट्रातून तणमोर नामशेष झाला असल्याचे जवळपास जाहीर करण्यात आले होते. मात्र, अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात शेतात आणि त्याला लागून असलेल्या गवताळ प्रदेशात तो दिसल्याची माहिती मिळाली. अभ्यासक आणि स्थानिकांनी पुढे येऊन या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला विशेष संरक्षणही देण्यात आले. याच वेळी तणमोरला वाचविण्यासाठी, त्याचा अधिवास शोधण्यासाठी काही तणमोरांना पकडून सॅटलाइट टॅग लावून अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे विणीच्या हंगामाच्या वेळी, तसेच इतर वेळी तो कोणकोणत्या भागात फिरतो, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमध्ये सातत्य राहिल्यास पुढील काही वर्षात तणमोरांची संख्या महाराष्ट्रात वाढल्याचे चित्र बघायला मिळेल.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!