नेमबाज शिकारी, माळरानाचा राजा Caracal
वन विभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबर हा कालवाधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. वन्यप्राण्यांचे महत्त्व, निसर्गसाखळीतील त्यांचे स्थान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. या निमित्ताने निसर्गवार्तामध्ये पुढील सात दिवस आपण नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या, प्रचलित नसलेल्या, पण वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राण्यांची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या अशाच एका अनोख्या प्राण्याबद्दल
वाघ, बिबट्या, रानमांजरांसह मार्जार कुळातील कॅराकल Caracal हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी. मराठीमध्ये याला शशकर्ण असं छान नावही आहे. सशासारख्या कानांमुळे आणि त्यावरील छोट्याशी झुपेकदार केसांमुळे याला शशकर्ण हे नाव पडले असावे. मांजरापेक्षा मोठा आणि बिबट्यापेक्षा लहान अशा देखण्या प्राण्याला उत्तम शिकारी समजले जाते. आशिया खंड आणि आफ्रिकेमध्ये या प्राण्याचे प्रामुख्याने वावर आढळतो.
भारतामध्ये सध्या राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेशामध्ये त्याचा मोजक्या संख्यने वावर आहे. शुष्क प्रदेशांमध्ये तो राहतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत मेळघाटमध्येही त्याचे वास्तव्य होते.
हेही वाचा: ऑपरेशन भेडिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर
वाईट बाब म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये शशकर्णची संख्या धक्कादायकरित्या कमी झाली आहे. त्यामुळे सध्या त्याला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
शशकर्णच्या अंगावर इतर भाऊबंदाप्रमाणे अंगावर ठिपके किंवा पट्टे नसतात. तो मातीच्या रंगाचा फिकट तपकरी रंगाचा. काजळ घातल्याप्रमाणे त्याचे डोळे दिसतात. तो किती उत्तम शिकारी आहे, याची प्रचिती त्याची तीक्ष्ण नजर लगेचच कळते. शशकर्ण हा अतिशय लाजाळू असल्याने सहसा तो दिवसाबाहरे पडत नाही. रात्रीच तो सक्रीय असतो. इतर मांजरांप्रमाणेच स्वतःची हद्द निश्चित करून हे प्राणी राहतात. भारतात पूर्वी राजामहाराज शशकर्णला पाळायचे. दरबारातील पाहुण्यांसमोर खेळांचे कार्यक्रम असताना, चौकात कबुतरांचा थवा आणून शशकर्णाला पिंजऱयातून मोकळे सोडायचे. एका उडीत पाच ते सहा कबुतारांची शिकार करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. सर्वाधिक शिकारी करणाऱया शशकर्णाचे कौतुक केले जात असे. पुढे शशकर्णाला पाळले गेले नाही.
सध्या भारत वगळता इराण, अफ़्रिकेच्या काही भागात शशकर्ण दिसतात, मात्र त्यांची मोठ्या प्रमाणात शिकारही केली जाते, कारण शशकर्ण अनेकदा पाळी प्राण्यांची शिकार करतात. भारतातही परिस्थिती वेगळी नाही.
हेही वाचा: कारवी – रानफुलांमधील अत्यंत देखणी वनस्पती
राजस्थान आणि गुजरात राज्यातील काही मोजक्या भागात अंदाजे पन्नास शशकर्ण शिल्लक आहेत. आशियाई चित्त्यानंतर भारतातून नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचणारी कॅराकल ही दुसरी मांजराची प्रजाती आहे.
कॅराकलची संख्या कमी होण्यामागची कारणे शोधत असतानाच, राष्ट्रीय जैवविविधता वन्यजीव मंडळाने कॅराकल वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार राजस्थानमधील रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे २८ कॅराकल आहेत. तर गुजरातमधील कच्छमध्ये सुमारे २० कॅराकल आढळतात.
गेल्या पन्नास ते साठ वर्षात या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली असून बेकायदेशीर व्यापारही झाला आहे. पूर्वी मध्य प्रदेशामध्ये यांची संख्या समाधानकारक होती, आज तिथेही ते दिसेनासे झाले आहेत. मोकळ्या जंगलामध्ये शशकर्ण राहोत. मात्र, या जमिनींना पडीक असल्याचे कारण दाखवत ठिकठिकाणी त्यावर अतिक्रमण झाले आहे. मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे या प्राण्याचा अधिवास संपत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या प्राण्याला वाचविण्यासाठी देशात कॅराकल ब्रिडिंग सेंटर सुरू करायला हवीत, अशी अभ्यासकांची मागणी आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.